लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सर्वाधिक शेतकरी आठवडाबाजार गेल्या वर्षभरात ठाणे जिल्ह्यासह शहरात भरवण्यात आले. शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही त्याचा फायदा झाला. तद्वतच, धान्य महोत्सव भरवण्याची कल्पना नावीन्यपूर्ण असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे धान्य बाजारभावापेक्षा कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्र मांना जिल्हा प्रशासनातर्फे बळ देऊन ते सुरू करणार असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले.शनिवारी पातलीपाडा येथील ऋ तू पार्कजवळील माझी आई शाळा येथे आयोजित दुसऱ्या धान्य महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. हा महोत्सव १० मे पर्यंत सकाळी १० ते रात्री १० वाजतापर्यंत होणार असून ठाणेकरांनी जसा गावदेवीला धान्य महोत्सवाला प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद याला मिळण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यात सुरू केलेल्या ४४ आठवडाबाजारांचा फायदा शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही झाला आहे. त्यात, आता धान्य महोत्सव ही चांगली कल्पना असून काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांस अशा माध्यमातून श्रमाचे पैसे थेट मिळणार असतील, तर या उपक्रमांना उत्तेजन दिलेच पाहिजे. नाम आणि संस्कार संस्था तसेच इतरही सेवाभावी संस्था पुढे आल्यास त्यांना जिल्हा प्रशासन सहकार्य करेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले. जिल्ह्यात ७० लाखांपेक्षा जास्त नागरिक शहरी भागात राहतात आणि उर्वरित ग्रामीण भागातले आहेत. शहरी ग्राहकांना दर्जेदार धान्य बाजारभावापेक्षा कमी दरात मिळत असेल, तर त्याला निश्चित उदंड प्रतिसाद मिळेल. धान्याचे पॅकिंग व्यवस्थित असावे तसेच बाजारभावापेक्षा कमी दरात आणि दर्जेदार धान्य असेल, तर आपली विश्वासार्हता वाढेल, असे मार्गदर्शनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
जिल्हा प्रशासनाचाही धान्य महोत्सव
By admin | Updated: May 7, 2017 05:54 IST