लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : स्वपक्षाच्या काहींचा काटा काढण्यासाठी, पक्षात स्वत:ची ताकद आणि वर्चस्व वाढवण्यासाठी, अन्य पक्षाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्याचा सपाटा लावणाऱ्या भाजपा आमदार नरेंद्र मेहतांपुढे आता उमेदवारी कोणाला द्यायची? याचे धमर्संकट उभे ठाकले आहे. पक्षातील जुने कार्यकर्ते, अनेक विद्यमान नगरसेवक तसेच गरजेपोटी आश्वासने देऊन पक्षात घेतलेल्या अनेकांचे पत्ते कापले जाणार असल्याच्या चर्चेने भाजपात असंतोष खदखदत आहे. त्यामुळे मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीत सर्वात जास्त बंडाळी भाजपात होण्याची चिन्हे आहेत. बंड मोडून काढणे, निवडणुकीचे वारे समजून घेणे, त्यात ठराविक मुद्दे योग्य वेळी आणणे, वेगवेगळे समाजगट सांभाळणे आणि आर्थिक आघाडी भक्कम असणे ही मेहता यांची वैशिष््टये मानली जातात. त्यातच मुंबई-ठाणे, भिवंडीप्रमाणेच पक्षाकडूनही उमेदवारांना घसघशीत निधी मिळणार असल्याने भाजपात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे.विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मेहता यांनी जी गणिते जुळवली त्यावेळेपासूनच अनकांना पालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यातील अनेकांची गरज आता संपली आहे. त्यातही पालिकेत भाजपाची सत्ता आणायची असेल तर बदलेलेल्या प्रभाग रचनेचा, सामाजिक गणितांचा विचार महत्त्वाचा असल्याने पक्षातील विद्यमान नगरसेवकांचाही पत्ता कापला जाण्याची चिन्हे आहेत. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादीलाही भगदाड पडल्याने, मनसे, बविआही निष्प्रभ ठरल्याने शिवसेना वगळता एकही प्रभावी विरोधक उरलेला नाही. त्यामुळे आर्थिक व राजकीयदृष्ट्या सक्षम झालेल्या मेहता यांचाच एकछत्री अंमल आणि प्रभाव या निवडणुकांवर आहे. भाजपाच्या प्रदेश नेतृत्वानेही त्यांच्याच हाती निवडणुकीची सूत्रे सोपवल्याने पक्षांतर्गत नाराजांनाचाही आवाज दाबला गेला आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी बाहेरून पक्षात आलेल्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यातच प्रभागाचा आकारही दुप्पट झाला आहे आणि स्वबाविकपणे खर्चही. त्यामुळे इच्छुकांत धाकधूक आहे. मेहतांनी मात्र काही ठराविक जणांनाच प्रचारासाठी हिरवा कंदिल दाखवला आहे आणि उरलेल्यांना सबुरीचा उपदेश केला आहे. त्यातही सध्याच्या पद्धतीनुसार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत बहुतांश इच्छुकांना झुलवत ठेवले जाऊ शकते. माजी आयुक्त शिवमूर्ती नाईक, माजी नगरसेवक ओमप्रकाश अग्रवाल, ज्येष्ठ कार्यकर्ते अॅड. दिलीप पंडित, भगवान कौशिक आदींनी आधीच मेहतांविरुध्द बंडाचा झेंडा फडकावत नव्या भाजपाची स्थापना केली आहे.
भाजपात अंतर्गत असंतोष
By admin | Updated: June 29, 2017 02:36 IST