ठाणे : आताच ठिकठिकाणी डिजिटलचे वारे वाहत आहेत, किंबहुना त्याचा गवगवा केला जात आहे. परंतु, याची सुरुवात खऱ्या अर्थाने शिवसेनेने चार वर्षांपूर्वी केली असल्याचे सांगून शिवसेनेचे युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला.महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी महापालिका शाळांमध्ये सुरू करण्यात येत असलेल्या व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन गुरु वारी महापालिकेच्या शाळा क्रमांक १९ मध्ये ठाकरे यांच्या हस्ते, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाले. त्याचप्रमाणे, मुलींना आणि महिलांना स्वसंरक्षणासाठी सिद्ध करण्यासाठी दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्राचे तसेच बिलियडर््स प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनही याप्रसंगी त्यांच्या हस्ते पार पडले.आता जरी डिजिटल संकल्पनेचा गवगवा केला जात असला, तरी त्याची सुरुवात शिवसेनेने केल्याचा अप्रत्यक्ष टोला त्यांनी या वेळी भाजपाला लगावला. तसेच मुंबईप्रमाणे ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हाती टॅबदेखील देण्यात यावेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले. विद्यार्थ्यांना डिजिटलच्या माध्यमातून शिक्षण देत असताना त्यांना आयएस, डॉक्टर, खेळाडू, कलाकार आदींचे या माध्यमातून शिक्षण देण्याची सुरुवात पालिकेने करावी, एकाच छताखाली शेकडो विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊन भविष्यात कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे, हे त्यांना सोपे जाईल, असेही त्यांनी सांगितले. महापालिका शाळांची अवस्था काहीशी बिकट असली तरी ती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही आश्वासन त्यांनी या वेळी दिले. शाळांची पटसंख्या कमी होत असल्याचे मान्य करून ती वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे शिक्षण हे महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणे, किंबहुना राज्यातील महाविद्यालयांतदेखील या शिक्षणाचा फायदाच होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना आता फुटबॉलचेही प्रशिक्षण देणे सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे महापालिकेच्या विष्णुनगर येथील शाळा क्र मांक १९ येथे व्हर्च्युअल क्लासरूमसाठी दोन स्टुडिओंची उभारणी करण्यात आली आहे. या उपक्र मांतर्गत पहिल्या टप्प्यात ठाणे महापालिकेच्या १३ माध्यमिक शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्यात आले असून त्यात १० मराठी आणि ३ उर्दू शाळांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
डिजिटल शिवसेनेनेच सर्वप्रथम ‘करून दाखवले’
By admin | Updated: December 23, 2016 03:10 IST