मीरारोड- मीरारोडमध्ये एका मुलीस फूस लावून दुचाकीवरून नेत नंतर तिच्याशी अश्लील चाळे करत लैंगिक अत्याचार करणाऱ्या वासनांध डिलिव्हरी बॉयला मीरारोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तो मूळचा उत्तर प्रदेशचा असून गेस्ट हाउसमध्ये राहत होता.
मीरारोड पोलीस ठाणे हद्दीत एका १३ वर्ष ४ महिन्याच्या अल्पवयीन मुलीला अनोळखी तरुणाने भाईंदर किधर है असं विचारून रस्ता दाखव सांगत दुचाकीवर बसवले होते. नंतर त्याने तिला नया नगर भागातील अलीहजरत ग्राऊंड समोर नवीन बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पहिल्या माळयावर नेवून तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. मुलीने नकार दिल्यावर तिला ती राहत असलेल्या इमारतीच्या काही अंतरावर आणून सोडून देऊन पळून गेला होता.
पोलिसांनी २८ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करत वरिष्ठ निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रविण भोसले व संतोष सांगवीकर सह सेंदीप गिरमे, हनुमेत तेरवे, बालाजी हरणे, प्रकाश पवार, शंकर शेळके, अथर्व देवरे व चंद्रदीप दासरे यांनी आरोपीचा शोध सुरु केला. पोलिसांनी विविध भागातील सुमारे ८५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात मुलीला दुचाकीवरून बसवून नेताना तो दिसला. नंतर काही भागात तो कॅमेऱ्यात न दिल्याने पोलिसांनी त्याचे कपडे आणि दुचाकीवरून अन्य कॅमेरे तपासत त्याची ओळख पटवली.
आरोपी अजय धर्मा गुप्ता (वय २३ वर्षे) ला दीपक रुग्णालय मागील युथ व्हॅली गेस्ट हाऊसमधून ३० एप्रिलच्या रात्री अटक केली. गुप्ता स्विगी डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत होता. तो मूळचा डौकी, ता. फतेहबाद, जि. आग्रा, उत्तर प्रदेशचा आहे. त्याने आधी देखील एका मुलीस रस्ता दाखव सांगून वासना शमवण्यासाठी दुचाकीवरून नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुलगी निघून गेल्याने बचावली. गुप्ताला २ मे पर्यंत ठाणे न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.