मुरबाड : गेल्या काही दिवसांपासून मुरबाड तालुक्यात कोरोनाच्या रुग्णात होणारी वाढ पाहता हे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनासमोर मोठे आव्हान असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून मुरबाड शहरी, ग्रामीण भागात दुपारी बारानंतर संचारबंदी करण्याचे आदेश तहसीलदार अमोल कदम यांनी जारी केले आहेत. किराणा, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यासाठी सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत मुभा दिली आहे.
लग्नसोहळ्यात नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांनी माळीपाडा व कोरावळे येथे कायदेशीर कारवाई केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण तालुक्यातील व्यवहार हे सकाळी सात ते बारापर्यंतच सुरू राहतील. औषधांची दुकाने सोडून सर्वच दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या बैठकीत तहसीलदार, नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी व नागरिक यांच्या उपस्थितीत झाला.
कोरोनाच्या तालुक्यातील वाढत्या प्रादुर्भावामुळे दररोज ५०च्या आसपास वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता चिंतेचे वातावरण पसरले आहे.
व्यापाऱ्यांनी सांगितले की जर आम्ही जिवंत राहिलो तरच आम्ही व्यवसाय करू. याकरिता कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे मत संजय तेलवणे, भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. यामुळे बैठकीत निर्णय घेण्यात आला की, रोज सकाळी सात ते बारापर्यंतच अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहतील. त्यानंतर सर्वच दुकाने बंद राहतील. यामध्ये दुधाची विक्रीही दुपारी बारापर्यंतच केली जाणार आहे. तर शुक्रवारी फक्त औषधांची दुकाने सोडून सर्वच दुकाने बंद राहतील असा निर्णय घेण्यात आला. तरी तालुक्यातील नागरिकांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कथोरे यांनी नागरिकांना केले आहे.