मुंबई : भिवंडीतील एका तरुणाने पाचशेच्या नोटांची कलर झेरॉक्स काढून चलनात आणताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ६४ हजार रुपये किमतीच्या अशा बनावट नोटा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.इरफान खान (३०) असे आरोपीचे नाव आहे. तो घोडबंदर रोडवरील फळविक्रेत्यांकडे पाचशेच्या बनावट नोटा वटवण्यासाठी येणार असल्याची माहिती चितळसर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून पोलिसांनी त्याला शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. त्यावेळी झडतीत त्याच्याकडे एकच क्रमांक असलेल्या पाचशेच्या पाच बनावट नोटा सापडल्या. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून ६४ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.या नोटा छापण्यासाठी साडेतीन हजार रुपयांचा प्रिंटर खरेदी केला होता. हा प्रकार एक ते दीड महिन्यापासून सुरू केला होता. त्याने किती नोटा चलनात आणल्या आहेत, याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी दिली.
कलर प्रिंट्स काढून बनावट नोटा चलनात, ६४ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 03:17 IST