ठाणे : मागील चार वर्षे आयुक्तांच्या अर्थंसकल्पावर काम केल्यानंतर यंदा प्रथमच नगरसेवकांच्या अपेक्षेप्रमाणे अर्थसंकल्पात तरतूद केली असतांनाही त्याच्या जमा, खर्चावर चर्चा करण्यासाठी नगरसेवकांना इंटरेस्टच नसल्याची बाब अर्थसंकल्पावरील विशेष महासभेच्या निमित्ताने समोर आली आहे. कोरम अभावी आणि अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे मंगळवारी ही महासभा अर्ध्यावरच तहकूब करावी लागल्याची नामुष्की ओढवली.ठाणे महापालिका आयुक्तांनी २०१६-१७ चे मूळ अर्थसंकल्प २५४९.८२ कोटींचे सादर केले होते. त्यात स्थायी समितीने १०९.५० कोटींची वाढ सुचवितांना आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात प्रभाग सुधारणा निधीसाठी एकाही पैशाची तरतूद केली नव्हती. परंतु, स्थायीने नगरसेवक निधीसाठी ३१ कोटी ६१ लाख आणि प्रभाग सुधारणानिधीसाठी ४०.५० कोटींची भरीव तरतूद केली आहे. यामुळे प्रत्येक नगरसेवकाला नगरसेवक निधी म्हणून २३ लाख ४१ हजार आणि प्रभाग सुधारणा निधी म्हणून ३० लाख उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार, सुधारीत २६५९.३२ कोटींचा अर्थसंकल्प २२ मार्चला महासभेला सादर केला होता. त्यानंतर २२ तारखेला यावर चर्चा झाल्यानंतर सोमवारी पुन्हा यावर चर्चा झाली. मंगळवारीदेखील सकाळी जमा, खर्चाच्या बाजूने चर्चा सुरु होती. परंतु, अधिकाऱ्यांची गैरहजेरी असल्याचे कारण पुढे करून वांरवांर अशा प्रकारे अधिकारी गैरहजर राहत असल्याने महासभा तहकूब करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यानुसार, ही महासभा पुर्णवेळासाठी तहकूब केली.प्रत्यक्षात अधिकाऱ्यांवर खापर फोडणाऱ्या नगरसेवकांनाच यावर चर्चा करण्यास इच्छा नसल्याची बाब समोर आली आहे. महासभेला एक तृतींयाश कोरम असणे अपेक्षित असते. सकाळच्या सत्रात काही नगरसेवकांनी केवळ मस्टरवर स्वाक्षरी करून काढता पाय घेतला. त्यामुळे सभागृहातील कोरम आधीच अपूर्ण होता. त्यात दुपार पर्यंत तो अधिकच कमी झाला.चार वर्षे बजेट मिळत नसल्याची ओरड करणाऱ्या नगरसेवकांनीच यंदा संधी असतांनाही दांडी मारली तर काहींनी बाहेरचा मार्ग पत्करला.
आपल्याच मागण्यांकडे नगरसेवकांनी फिरवली पाठ
By admin | Updated: March 30, 2016 01:46 IST