भिवंडी : शहरातील तीन मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सरकारने निधी मंजूर केलेला आहे. मात्र, या रुंदीकरणास नुकत्याच झालेल्या महासभेत काही नगरसेवकांनी विरोध केला. यामुळे वाहतूककोंडीच्या समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.अंजूरफाटा ते नदीनाका (ठाणे-वाडारोड), वंजारपाटी ते चाविंद्रा (नाशिकरोड),राजीव गांधी चौक, कल्याणनाका ते टेमघर (कल्याण रोड) हे शहरातील तीन मुख्यमार्ग आहेत. या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे कोंडी टाळण्यासाठी व शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी या मार्गावर तीन उड्डाणपूल बांधले. काँक्रिटीकरणासाठी राज्य व केंद्र सरकारने निधी मंजूर केल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यास अनुसरून या मार्गावरील सध्याची वाहतूक पाहता दोन्ही बाजंूस तीन मीटर रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव नगररचना विभागाकडून महासभेत ठेवला होता. रुंदीकरण झाल्यास वाहतूककोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. असे असताना महासभेतील काही नगरसेवकांनी या प्रस्तावास विरोध केल्याने या विषयास अनुसरून महापौर तुषार चौधरी यांनी महासभा तहकूब केली. त्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला.काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे यांनी सूचक म्हणून हा प्रस्ताव मांडला, तर शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर पाटील यांनी या प्रस्तावास अनुमोदन दिले. (प्रतिनिधी)
रस्ता रुंदीकरणास नगरसेवकांनीच घातला खो
By admin | Updated: July 25, 2016 02:54 IST