मुंबई : ठाणे आणि नवी मुंबई परिवहन सेवेतील ठेकेदारांच्या दरातील तफावतीची सखोल चौकशी करून चार आठवड्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना ठाणे महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. या अहवालात दोषी आढळून येणा-या अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.ठाणे परिवहन सेवेतील बस दुरुस्तीसाठीच्या साधन खरेदीतील घोटाळ्याबाबत राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे, नरेंद्र पाटील, किरण पावसकर, हेमंत टकले यांनी लक्षवेधी मांडली. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री म्हणाले की, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निमाण योजनेंतर्गत १४० मोठया आकाराच्या तर ५० मध्यम आकाराच्या बसेसचा पुरवठा करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार २०१५ सालच्या ६८ तर २०१६ च्या २४ बसेस आहेत. लोकसंख्यनुसार ठाणे शहरात ७०० बसेसची आवश्यकता असताना सध्या फक्त २६४ बसेस कार्यान्वित आहेत. तर ३०० बसेस मुंबई , नवी मुंबई आणि अन्य महानगरपालिका परिवहन सेवेच्या आहेत. ठाणे परिवहन सेवा स्वयंपूर्ण करण्याच्यादृष्टीने पाऊले उचलली जातील, अशी ग्वाही रणजित पाटील यांनी यावेळी दिली. (विशेष प्रतिनिधी)
ठाणे परिवहन सेवेच्या ठेकेदारांचा दर घोटाळा
By admin | Updated: March 10, 2017 01:05 IST