ठाणे : सध्या भाजी मार्केटमध्ये पालेभाज्या महागल्या आहेत. फळभाज्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. मेथी, कोथिंबीरचे भाव अर्धशतक गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. तर मटार चक्क शंभर रुपयांपर्यंत पोहोचले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सध्या संत्र्यांची आवक नसल्याने त्याची जागा माल्टाने घेतली आहे. संत्र्यांसारखेच असणाऱ्या या फळाला कोरोनामुळे मागणी वाढली आहे. किराणामध्ये तेलाचे दर चढेच असल्याची नाराजी विक्रेते आणि ग्राहकांनी व्यक्त केली आहे.
काही दिवस पालेभाज्या स्वस्त असल्याने त्याची खरेदी वाढली होती. काही दिवसांपासून भाव वाढले असल्याचे भाजीविक्रेते निरंजन ढगे यांनी सांगितले. मेथी, कोथिंबीरमध्ये १५ ते २० रुपयांनी तर पालकमध्ये पाच रुपयांनी वाढ झाली आहे. फळभाजीत मटार महागला आहे. २० रुपयांनी मिळणारे मटार होलसेलमध्ये ७० रुपयांनी मिळत असल्याची नाराजी ढगे यांनी व्यक्त केली. तसेच १० ते २० रुपयांनी मिळणारा फ्लॉवर ३० ते ४० रुपयांनी मिळत आहे. सफरचंद, ड्रॅगन, आणि किवीचे दर वाढलेले आहेत. कलिंगड, खरबूजचे दर कमी आहेत, असे फळविक्रेते कटवारू गुप्ता यांनी ‘लोकमत’ला सांगितले. किराणामध्ये तेलाचे भाव वाढलेले असल्याचे किराणा विक्रेते भुरालाल चौधरी यांनी सांगितले.
--------------------
पालेभाज्या
मेथी होलसेलमध्ये २५ ते ३० रुपये तर किरकोळमध्ये ४० ते ५० रु., शेपू होलसेलमध्ये १५ ते २० रु. तर किरकोळमध्ये २५ रु., लालमाठ होलसेलमध्ये १० तर किरकोळमध्ये २० ते ३० रु., पालक होलसेलमध्ये १० ते १२ रु. तर किरकोळमध्ये २० ते ३० रु., कांदापात होलसेलमध्ये ३० रु. (मोठी जुडी) तर किरकोळमध्ये १५ ते २० रु., (छोटी जुडी), चवळी होलसेलमध्ये १० रु. तर किरकोळमध्ये २० रु., कोथिंबीर होलसेलमध्ये २५ ते ३० रु. तर किरकोळमध्ये ४० ते ५० रु. जुडी असे भाव आहेत. मटार होलसेलमध्ये ७० रु. तर किरकोळमध्ये ९० ते १०० रु., फ्लॉवर होलसेलमध्ये ३० ते ४० रु. तर किरकोळमध्ये ६० रु. किलोने मिळत आहे.
------------------------------------
गाेडेतेल १६० ते १७० रुपये लीटर
गोडेतेल होलसेलमध्ये १२० ते १२५ रु तर किरकोळमध्ये १६० ते १७० रु लीटरने मिळत आहे. गाेडेतेलाचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांना फटका बसत आहे. तर चवळी, वाटाणा, चणा या कडधान्यांच्या किमती स्थिर आहेत. डाळींमध्येही किरकाेळ वाढ झाली असल्याचे दिसून येते.
------------------------------------
सफरचंद २०० रुपये किलाे
सफरचंद होलसेलमध्ये १८० रुपये तर किरकोळमध्ये २०० रुपये किलो, ड्रॅगन होलसेलमध्ये ९० रुपये तर किरकोळमध्ये १०० रु. प्रतिनग, कलिंगड होलसेलमध्ये १३ ते १४ रु. तर किरकोळमध्ये १८ ते २० रु. किलो, खरबूज होलसेलमध्ये ३० तर किरकोळमध्ये ४० रु. किलो, माल्टा होलसेलमध्ये १३५ रु. तर किरकोळमध्ये १५० रु. प्रतिकिलो, किवी होलसेलमध्ये ९० रु. तर किरकोळमध्ये १०० रु. प्रत्येकी तीन नग मिळत आहे.
---------------------------------------
मेथी आणि कोथिंबीर सध्या प्रचंड महाग आहेत. चवळीचे भाव तसेच आहेत. कंदापातची मोठी जुडी खरेदी करून होलसेलमध्ये छोट्या जुड्या करून विकल्या जात आहेत. मटार, फ्लॉवर सोडले तर इतर भाज्यांचे भाव स्थिर आहेत.
- निरंजन ढगे, भाजीविक्रेते
----------------------------------------
कोरोनामुळे सफरचंद, माल्टा, किवी, ड्रॅगन या फळांना प्रचंड मागणी आहे. सध्या संत्री नसल्याने माल्टाला ग्राहक पसंती देत आहेत.
- कटवारू गुप्ता, फळविक्रेते
----------------------------------------
किरणामध्ये सध्या सर्व वस्तूंचे दर स्थिर आहेत. चवळी, चणा, वाटाणा यांबराेबरच तांदूळ, गहू आणि रवा यांच्या भावात फार चढउतार झालेला नाही. केवळ खाद्यतेलाचे भाव वाढत असल्याने ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत.
- भुरालाल चौधरी, किराणा दुकानदार