उल्हासनगर : शहरातील प्रभाग क्र.-१७ च्या बालेकिल्ल्यात दोन्ही काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेसह भाजपाने प्रभागावर लक्ष केंद्रित केल्याने काँग्रेसच्या भांडणाचा लाभ त्यांना होतो की काय, असे चित्र निर्माण झाले. काँग्रेस व राष्ट्रवादीची लढत शहराच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.उल्हासनगरात काँग्रेस व राष्ट्रवादीचा सफाया होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. ओमी कलानी यांनी पक्षातील ९५ टक्के नगरसेवकांसह पदाधिकारी पळवले आहेत. पक्षात नगरसेविका पुष्पा राजवानी व नगरसेवक सतरामदास जेसवानी यांच्यासह बोटांवर मोजता येतील, एवढेच कार्यकर्ते व पदाधिकारी राहिले आहेत. तीच परिस्थिती काँग्रेस पक्षाची झाली आहे. ८ पैकी ६ नगरसेवकांनी इतर पक्षांत प्रवेश केला असून अंजली साळवे व जया साधवानी या दोन नगरसेविका पक्षात राहिल्या आहेत. जिंकून येण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्षपद आमदार ज्योती कलानी यांच्याकडे असले तरी पक्षाची जबाबदारी भरत गंगोत्री यांच्याकडे वरिष्ठांनी दिली.प्रभाग क्र.-१७ मध्ये काँग्रेसच्या नगरसेविका जया साधवानी, माजी नगरसेवक मोहन साधवानी, तर राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक भरत गंगोत्री, नगरसेवक सतराम जेसवानी, माजी नगरसेविका सुनीता बगाडे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दोन्ही काँग्रेसमधील भांडणाचा फायदा घेण्यासाठी भाजपाचे मास्टर माइंड राजा गेमनानी यांनी पॅनल उभे करून त्यांच्यासमोर आव्हान उभे केले. ते स्वत: रिंगणात उतरले असून त्यांच्यासोबत नगरसेवक राजेश वानखडे यांची मुलगी, नगरसेविका अनिता भानुशाली यांचे पती सचिन भानुशाली आहेत. तर, शिवसेनेकडून शिक्षण संस्थाचालक प्रकाश गुरनानी, उद्योगपती ठाकूर चांदवानी उभे ठाकले आहेत. प्रभाग क्र.-१७ मध्ये सिंधी भाषिक असून मराठी टक्का २० ते २५ टक्के आहे. पाण्याची समस्या नसल्यासारखी असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. उच्चभू्र लोकवस्तीचा प्रभाग म्हणून प्रभाग क्र.-१७ कडे पाहिले जाते. काँग्रेस पक्षाच्या उमेदवार नगरसेविका जया साधवानी व राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक यांच्यात हाडवैर असून या प्रभागामुळेच दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली नाही. प्रचाराचा धमाका चारही पक्षांनी लावल्याने येथे चौरंगी मुकाबला असून सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला. यापूर्वी येथून काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक निवडून आले असून या वर्षी दोघांतील भांडणाचा लाभ घेण्यासाठी भाजपा व शिवसेना पुढे सरसावली आहे. (प्रतिनिधी)
काँग्रेस-राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला
By admin | Updated: February 12, 2017 03:44 IST