वसई : अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी आलेल्या वसई विरार महापालिकेच्या पथकावर दगडफेक करणे, शिवीगाळ करणे, बुलडोझरची मोडतोड करणे आदी प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आगरी सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने शनिवारी शिरगाव जवळील कुंभारपाडा परिसरातील अनधिकृत चाळी तोडण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी पथकाने आगरी सेनेचे कार्यालय असलेल्या अनधिकृत चाळींमधील खोल्या तोडण्यास सुरुवात केली. त्यावेळी आगरी सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. कार्यकर्त्यांनी पथकावर दगडफेक केली. काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. बुलडोझरची मोडतोड केली होती. इतकेच नाही तर भूपेंद्र पाटील याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचे नाटक केले. तर नीरा नारायण पाटील, वनिता पाटील यांच्यासह आणखी दोन महिला आणि एका पुरुषाने गळ्यात दोर बांधून गळफास लावून आत्महत्या करू अशी धमकी दिली होती. त्यामुळे महापालिकेच्या पथकाला कारवाई थांबवून मागे परतावे लागले होते. सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून आगरी सेनेचे अध्यक्ष जनार्दन पाटील, मोहन पाटील, भूपेंद्र पाटील, किशोर कारेकर, नीरा पाटील, वनिता पाटील यांच्यासह साठ ते सत्तर जणांविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
आगरी सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: February 7, 2017 03:49 IST