ठाणे : कॅडबरी ते पोखरण रस्ता, स्टेशन परिसर, खोपट रस्ता, कापूरबावडी रस्त्याचे रुंदीकरण केल्यानंतर आता टिकुजिनीवाडी, पोखरण रोड नं. १, कापूरबावडी जंक्शन, जांभळीनाका ते स्टेशन ते गोखले रोड या रस्त्यांच्या रुंदीकरणाचा कार्यक्रम पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हाती घेतला आहे. त्यानुसार, त्यांनी शनिवारी तब्बल सहा तास पायी चालत त्यांची पाहणी करून सोमवारपासून येथील वाढीव अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सकाळी १० वाजता आयुक्तांनी हॅप्पी व्हॅली ते टिकुजिनीवाडी येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्याचे काम कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्च अखेर पूर्ण करून ७ एप्रिलपासून तो वाहतुकीस खुला करण्याचे आदेश दिले. त्यानंतर, त्यांनी पोखरण रोड नं. १ ची पाहणी करून शास्त्रीनगर ते उपवनपर्यंतच्या उर्वरित पट्ट्यातील वाढीव अनधिकृत बांधकाम सोमवारपासून पाडण्याच्या सूचना दिल्या.कापूरबावडी जंक्शन येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी करून झाल्यानंतर तेथील रहिवाशांशी संवाद साधून रुंदीकरण मोहिमेमुळे त्यांच्यावर कसलाही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही दिली. या वेळी त्यांनी जांभळीनाका ते सुभाष पथ ते स्टेशन रोडमार्गे गोखले रोड या परिसराची पाहणी केली. रस्ता रुंदीकरणानंतरही ज्या व्यावसायिकांनी रोड लाइनच्या बाहेर परत दुकाने थाटली होती, त्यांच्यावर कारवाई करून त्यांचा माल जप्त केला.या पाहणी दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रतन अवसरमोल, अतिरिक्त नगर अभियंता अनिल पाटील, उपनगर अभियंता राजन खांडपेकर, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, नितीन पवार, हातिम अली, सहायक आयुक्त मारुती गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते.कल्पतरूजवळ उभारणार निसर्ग उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ कल्पतरू गृहसंकुलाजवळ महापालिकेस प्राप्त झालेल्या सुविधा भूखंडावर निसर्ग उद्यान निर्माण करण्याचे आदेश त्यांनी उद्यान विभागास दिले. एकूण क्षेत्रफळ ४५१९.७४ चौरस मीटर असलेल्या या भूखंडावर सद्य:स्थितीत असलेली झाडे तशीच ठेवून त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच स्टार मॉलच्या समोर असलेल्या तलावाच्या सुशोभीकरणाचेही आदेश दिले.
रुंदीकरणासाठी आयुक्तांची सहा तास पायपीट
By admin | Updated: March 27, 2016 02:22 IST