लोकमत न्यूज नेटवर्कमुरबाड : तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून अशोक देसले या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूची सीआयडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी सोमवारी मुरबाड येथे काढलेल्या निषेध मोर्चात करण्यात आली. मोर्चेकऱ्यांना सामोरे जाताना उपविभागीय अधिकारी प्रसाद उकिर्डे यांनी दोन दिवसात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या मोर्चाचे नेतृत्व शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा , भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, माजी आमदार गोटीराम पवार, दिगंबर विशे, सुभाष घरत, कांतिलाल कंटे, रवींद्र चंदने, कैलास चौधरी, गणपत विशे, प्रकाश पवार यांनी केले. शिवाजी चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. तहसील कार्यालयाजवळ पोलिसांनी मोर्चा अडवला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. देसले याने वडिलांच्या नावावर असलेली जमीन महसूल कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पध्दतीने त्यांच्या चुलतभावाच्या नावावर करून दिली होती. तो फेरफार रद्द करावा अशी तक्रार आॅक्टोबर २०१६ मध्ये तहसीलदारांकडे केली होती. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ते सतत तहसील कार्यालयात हेलपाटे मारत होते. परंतु त्यांना न्याय मिळत नव्हता. शेवटी बुधवारी तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. याची चौकशी करून देसले यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
देसले आत्महत्येची सीआयडी चौकशी करा
By admin | Updated: May 16, 2017 00:04 IST