- मुरलीधर भवार, पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)
मुलांना जे वाचायला आवडते, ते तर मुलांना द्यावेच. मात्र, मुलांना काय आवडले पाहिजे, याचाही विचार करून बालसाहित्याचे लेखन व्हायला हवे. आजच्या बालसाहित्याने चांगली आणि हुशार मुले निर्माण केली, तर ‘बालकुमारांसाठीच्या लेखनाचे काय झाले’ हा प्रश्न उपस्थित होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ बालकुमार साहित्यिक डॉ. न.म. जोशी यांनी येथे केले.साहित्य संमेलनातील ‘बालकुमारांसाठीच्या लेखनाचे काय झाले?’ हा परिसंवाद शं.ना. नवरे सभामंडपात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डॉ. जोशी अध्यक्षस्थानी होते. जोशी म्हणाले की, बालसाहित्याचा केंद्रबिंदू मुले आहेत. त्याच्या त्रिज्या आणि व्यास हे लेखक आहेत. मुलांचे साहित्य म्हणजे बडबडगीते, अशी अनेकांची धारणा आहे. बडबडगीते म्हणजे बालसाहित्य नाही. ही समजूत बालसाहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांनी मनातून काढून टाकावी. तरच, वस्तुनिष्ठ बालसाहित्य लेखन केले जाऊ शकते. मुलांची कल्पनाशक्ती विलक्षण असते. तिला वळण लावण्याचे काम बालसाहित्यिकांनी केले पाहिजे. मुलांना जे काही सांगायचे, ते उपदेशाच्या भाषेत सांगू नये. त्यांच्या पातळीवर जाऊन सांगितले गेले पाहिजे, तेच मुलांना अधिक आवडते. मुलांचे भावनिक आणि बौद्धिक जीवन फुलवले पाहिजे. या दोन्ही गोष्टी बालसाहित्याकडून झाल्या पाहिजेत. या गोष्टी होत आहेत. मात्र, त्यांचे गुणात्मक प्रमाण कमी आहे. बालसाहित्य मुलांपर्यंत नेले पाहिजे. त्यांना बालसाहित्य प्रथम श्रवण करायला लावणे. त्यातून त्यांची वाचनाची आवड वाढेल, याकडे जोशी यांनी लक्ष वेधले. बालसाहित्यिक सुरेश सावंत यांनी सांगितले की, बालसाहित्य आणि बालशिक्षण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बालसाहित्य हे बालकांच्या भवितव्याशी निगडित बाब असल्याने त्यावर गंभीर स्वरूपात चर्चा व्हायला हवी. ती होताना दिसून येत नाही. मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला पाहिजे. बालसाहित्यातून मुलांचे आत्मभाव व भाव जागा होतो. बालसाहित्य हे उपेक्षित आहे. त्याला महत्त्वाचा प्रवाह मानले जात नाही. बोबडे बोल लिहिणे म्हणजे बालकविता होत नाही. मुलांना हल्ली संगणकाचा आणि टीव्हीचा पडदा आवडतो. मुले त्यांच्या आहारी गेल्याने ती यांत्रिक होतील. त्यांच्या चुकीच्या प्रवृत्ती उफाळून येतील. त्यांच्या बालमनाची भूक भागवणारे बालसाहित्य लिहिले पाहिजे.बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड म्हणाले की, मुलांचे साहित्य अनुकरणाच्या जंजाळात अडकून पडले, तर मुलांचे जग आणि भाषा समजून घेण्यास आपण कमी पडू. बालसाहित्य पाहिजे त्या प्रमाणात गुणात्मकदृष्ट्या वाढीस लागलेले नसून, ते संख्यात्मकदृष्ट्या वाढील लागले आहे. ते गुणात्मकदृष्ट्या वाढीला लागले पाहिजे. बालसाहित्याला एक प्रकारचे साचलेपण आले आहे. ते दूर झाले, तर बालसाहित्याला चांगले दिवस येतील. बालसाहित्यिक नरेंद्र लांजेवार यांनी सांगितले की, पालकांनी मुलांना चांगल्या बालमासिकांच्या वाचनाची सवय लावली पाहिजे. ही जबाबदारी एकट्या लेखकाची नाही. मनोरंजन व प्रबोधनासह बालसाहित्याने ज्ञानार्जनाचेही काम केले पाहिजे. बालसाहित्याला वाचनाश्रय, राजाश्रय आणि समीक्षाश्रय मिळत नाही. तो मिळाला तर बालसाहित्याला नक्कीच चांगले दिवस येतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूरेश साने यांनी केले.इयत्ता सहावीत शिकणाऱ्या बुलडाण्यातील मैत्री लांजेवार हिने त्याच्या वर्गातील १७ मुलांसह आबा गोविंद महाजन यांनी लिहिलेल्या १७ बालसाहित्यिक गोष्टींची समीक्षा केली आहे. या पुस्तकाचे संपादन मैत्री हिने केल्याने बालसाहित्यिक म्हणून व्यासपीठावर तिचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.