राजू काळे / भार्इंदरदेशभरातील बँकांकडे नोटा मोजण्याकरिता असलेल्या लक्षावधी यंत्रांच्या सॉफ्टवेअर व हार्डवेअरमध्ये किरकोळ किंवा मोठे बदल करावे लागणार आहेत. सरकारने काढलेल्या २ हजार रुपयांच्या नोटेचा आकार रद्द केलेल्या ५०० रुपयांच्या नोटेसारखा असल्याने सध्या काही यंत्रांमध्ये मोजण्याकरिता ही नोट टाकली, तर त्या यंत्रात तशी आज्ञावली नसल्याने २ हजारांच्या नोटेऐवजी ५०० रुपयांची दाखवत आहेत. काही यंत्रांत नोटेच्या आकारामुळे २ हजारांची नोट दुमडली जाते. यंत्रातील हे बदल नव्या ५०० आणि १००० रुपयांची नोट आल्यावर करावे लागणार आहेत.देशभरातील सर्वच बँकांकडे मिक्सनोट व्हॅल्यू काउंटर ही यंत्रे आहेत. या यंत्रांत वेगवेगळ्या मूल्याच्या नोटा टाकल्यावर यंत्र एकूण रक्कम किती व किती रकमेच्या किती नोटा मोजल्या, ते दाखवते. या यंत्राची किंमत १८ पासून ३२ हजारांपर्यंत आहे. दुसरे यंत्र हे सॉर्टर आहे. ही यंत्रे महागडी असून त्यांची किंमत दोन लाखांच्या घरात आहे. हे यंत्र वेगवेगळ्या मूल्याच्या नोटा वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये ठेवते. जुन्या व नव्या नोटा वेगळ्या करते. त्या यंत्रातही २ हजारच्या नोटेकरिता सोय नाही. नकली नोटा ओळखण्याच्या यंत्रात अल्ट्राव्हायोलेट सेन्सर, मॅग्नेटिक सेन्सर व इन्फ्रारेड सेन्सर बसवलेले आहेत. नोटेच्या मधोमध असलेल्या हिरव्या रंगाच्या रेषेत मॅग्नेट आहे किंवा कसे, ते या यंत्राद्वारे ओळखता येते. बनावट नोटांमध्ये मॅग्नेट नसते. नव्या असली नोटांमध्ये त्याची सत्यता पडताळून पाहण्याकरिता काही खाणाखुणा आहेत. परंतु, बनावट नोट ओळखण्याकरिता मुळात बनावट नोट तयार व्हायला हवी. ती तयार झाली तरच असली नोट व बनावट नोट यांच्यात काय तफावत आहे व ती ओळखण्याकरिता बनावट नोटा शोधणाऱ्या यंत्रात कोणते फेरबदल करावे लागतील, ते स्पष्ट होईल, अशी माहिती यंत्राचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांचे मत आहे.
नोटा मोजण्याच्या यंत्रात करावे लागणार बदल
By admin | Updated: November 15, 2016 04:37 IST