लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : यंदाही होळीवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे निर्बंध असल्याने यंदाही ती साजरी करता येणार नाही. परंतु, सध्याचे वाढते प्रदूषण पाहता महाराष्ट्र गो ग्रीन फाउंडेशन मात्र फळझाडे लावून होळी साजरी करणार आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात होळीपासून या पर्यावरणीय उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार असून, ५ जून म्हणजेच ‘जागतिक पर्यावरण दिना’पर्यंत एक हजार झाडे लावण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.
गेल्या वर्षी कोरोनामुळे होळीतील रंग आणि पिचकाऱ्यांवर ठाणेकरांनी बहिष्कार घातला होता. कोरोनाच्या सावटामुळे अनेकांनी धुळवड साजरी केली नव्हती. होळीनंतर देशभरात लॉकडाऊन जाहीर झाले आणि आजतागायत त्याचे नियम लागू आहेत. यंदाही कोरोनाचे नियम पाळायचे असून रंगपंचमी साजरी करता येणार नाही, असे ठाणे महापालिकेने सांगितले आहे.
ही सर्व पार्श्वभूमी पाहता संस्था यंदा पेरू, आंबा, चिकू, संत्रे, मोसंबी, नारळासह वड, पिंपळ, कडुनिंब यांसारख्या सावली देणाऱ्या झाडांचे रोपण करणार असल्याचे संस्थेचे कॅसबर ऑगस्टीन यांनी सांगितले.
----