भिवंडी : कशेळी येथील पद्मावती इस्टेट येथील इमारती उच्च न्यायालयाने अनधिकृत ठरविल्याने एमएमआरडीएने सोमवारी जमीनदोस्त केल्या. यामुळे येथील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. येथील रहिवासी ब्रम्हे कुटुंब धुळे येथे नातेवाइकांच्या लग्नकार्यासाठी गेले होते. सोमवारी परतल्यानंतर घर जमीनदोस्त झाल्याचे पाहून ते हतबल झाले. कोरोना संकटात ही कारवाई कशासाठी, असा सवाल ब्रम्हे परिवाराने एमएमआरडीए अधिकाऱ्यांना विचारला. मात्र, केवळ अनधिकृत बांधकामाचे कारण पुढे केल्याने हे कुटुंब प्रशासनावर भडकले.
मनीषा ब्रम्हे कुटुंबासह धुळे येथे लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. सोमवारी त्या घरी आल्या आणि इमारतींवर होत असलेली कारवाई पाहून अचंबित झाल्या. आम्ही हे घर घेताना बिल्डरला २५ लाखांहून अधिक रक्कम दिली. घर नोंदणी करताना तीन लाख ४० हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटीदेखील भरली. सर्व जमा बचत बिल्डरच्या घशात घालून आता आमच्या घरावर कारवाई होत आहे. बांधकाम अनधिकृत आहे तर मग स्टॅम्प ड्युटी भरताना अधिकारी झोपले होते का? आयुष्यभराची बचत घर खरेदीसाठी लावल्याने आता आम्हाला आमचे पैसे कोण परत देणार व आम्ही कुठे जाणार, असा संतप्त सवालदेखील मनीषा यांनी केला.
पद्मावती इस्टेटमध्ये १७० हून जास्त कुटुंबे असून, घराच्या नोंदणीसाठी आठ ते दहा कोटींहून अधिक ड्युटी आम्ही भरली आहे. त्यावेळी अधिकाऱ्यांना घरे अनधिकृत असल्याचे कसे कळले नाही. कोट्यवधींची स्टॅम्प ड्युटी भरूनही आमची घरे अनधिकृत कशी, इतके दिवस एमएमआरडीचे अधिकारी झोपेत होते का, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवासी किशोर जाधव यांनी व्यक्त केली.
===Photopath===
030521\20210503_145923.jpg
===Caption===
गावावरून कशेळी पद्मावती इस्टेट येथे परतलेले ब्रम्हे कुटुंब रिक्षात दिसत आहे .