ठाणे : सायबर सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या ठाण्यातील एका ‘बीपीओ’ कंपनीचा ८५ लाख रुपयांचा ‘डाटा’ कंपनीच्याच कर्मचाऱ्यांनी चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.वागळे इस्टेट भागात पॅडल पॉइंट बीपीओ सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यालय आहे. आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, वित्त, विमा आणि इतर क्षेत्रांतील उद्योगांना ‘आउटसोर्सिंग’ सेवा पुरवण्याचे काम ‘पॅडल पॉइंट’ करते. ही सेवा पुरवण्यासाठी ‘पॅडल पॉइंट’कडे वेगवेगळ्या उद्योगांचा ‘डाटा’ गोळा होत असतो. हा ‘डाटा’ सुरक्षित राहावा, यासाठी कंपनीने तगडी सायबर सुरक्षा ठेवली आहे. मात्र, या सुरक्षेला कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच तडा दिला. २३ नोव्हेंबर २०१६ ते २६ जानेवारी २०१७ या काळात साईबाबा आर. आणि रोहित पाल या दोन कर्मचाऱ्यांनी कंपनीचा डाटा चोरून तो परस्पर विकला. हा डाटा सुमारे ८५ लाख रुपये किमतीचा आहे. कंपनीच्या वतीने हरेश पाठक यांनी यासंदर्भात गुरुवारी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, दोन्ही कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासकामी सायबर सेलची मदत घेतली जाणार असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बीपीओ कंपनीची ८५ लाखांची डाटाचोरी
By admin | Updated: February 11, 2017 04:47 IST