लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : महावितरणच्या कल्याण परिमंडळात अभियंता दिनानिमित्त बुधवारी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या शिबिरात ५२ अभियंत्यांनी रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी जोपासली.
मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराला प्रारंभ झाला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. राज्यातील रक्ताची टंचाई लक्षात घेऊन संघटनेने अभियंता दिनानिमित्त रक्तदान शिबिराचा विधायक उपक्रम राबविला. या विधायक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत संघटनेचे बोबडे, नाहिदे हे प्रमुख पदाधिकारी, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांच्यासह अनेकांनी या शिबिरात रक्तदान केले. या शिबिरासाठी डोंबिवली येथील एका खासगी रक्तपेढीचे सहकार्य लाभले.
यावेळी कल्याण एक मंडळचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, कल्याण दोन मंडळचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, स्थापत्य विभागाचे अधीक्षक अभियंता विजय मोरे, कार्यकारी अभियंता (प्रशासन) अनिल महाजन, सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे प्रादेशिक सचिव श्रीनिवास बोबडे, सहसचिव रवींद्र नाहिदे यांच्यासह पदाधिकारी व अभियंते उपस्थित होते.
----------------------