राजू काळे/ऑनलाइन लोकमतभार्इंदर, दि. 25 - उत्तन सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भुतोडी बंदर येथील बोट मालकीणीवर बोटीच्याच खलाशाने ब्लेडने वार केल्याची घटना सोमवारी दुपारी १ वा. च्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपी खलाशाला अटक केली आहे. भुतोडी बंदर येथील मच्छिमार ब्लेस पांड्या (३५) यांची सेंट ब्लेस हि मासेमारी बोट आहे. त्यावर काही परप्रांतिय खलाशी गेल्या अनेक महिन्यांपासुन काम करतात. नेहमीप्रमाणे ब्लेस यांनी सोमवारी सकाळच्या सुमारास खलाशांना बोटीवर जाण्यास सांगितले. त्यातील सुनिल (२५) रा. झारखंड हा खलाशी बोटीवर न जाता इतरत्र गेला. तो दारु पिऊन दुपारी १ वा. च्या सुमारास ब्लेस यांच्या घरात शिरला. घरातील तळमजल्यावरील खोलीत ब्लेस यांचा सहावर्षीय मुलगा झोपला होता. सुनिलने त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला असता मुलाला जाग आली. त्यातच खोलीचा दरवाजा बंद असल्याने घरात असलेली त्याची आई व ब्लेस यांच्या पत्नी फ्रान्सिना यांनी मुलगा झोपल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे त्या दार न ठोठावता त्या वरील मजल्यावर निघुन गेल्या. तेवढ्यात मुलाने सुनिलच्या हातातुन सुटका करुन घेत आईकडे धाव घेतली. त्याने आईला सुनिलने केलेला प्रकार सांगितला. त्यावर फ्रान्सिना यांनी मुलाला आजोबांना बोलविण्यास सांगितले. तेवढ्यात सुनिलने त्याच्याकडे असलेल्या ब्लेडने फ्रान्सिना यांच्या गळ्यासह हातांवर सुमारे ७ ते ८ वार केले. तसेच आजोबांना बोलविण्यास जात असलेल्या मुलाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, फ्रान्सिना यांनी प्रसंगावधान राखुन त्वरीत सुनिलला पकडले. त्यामुळे सुदैवाने मुलगा बचावला. फ्रान्सिना यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केल्याने शेजारील लोकांनी पांड्या यांच्या घराकडे धाव घेतली. घडलेला प्रकार लक्षात येताच जमलेल्या लोकांनी सुनिलला पकडुन उत्तन सागरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीवर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच फ्रान्सिना यांच्यावर तातडीने उपचार झाल्याने त्यांची प्रकृती ठिक असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडुन सांगण्यात आले.
बोटीवरील खलाशाचे बोट मालकीणीवर ब्लेडने वार; आरोपीला अटक
By admin | Updated: April 25, 2017 16:52 IST