शहापूर : शहापूर विधानसभा मतदारसंघात गेली २५ वर्षे युतीचा धर्म पाळून भाजप शिवसेनेला मदत करीत आला आहे. मात्र अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची वाढलेली ताकद पाहता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेने भाजपला सोडावा, असा ठराव स्थानिक भाजप कार्यकारिणीने मंजूर केला असल्याने शिवसेनेच्या निर्णयावर नाराज असलेल्या दौलत दरोडा यांना आपल्याकडे खेचून भाजप रिंगणात उतरवण्याची दाट शक्यता आहे. विधानसभेला भाजप-शिवसेनेची युती झाली तर दरोडा यांना अपक्ष रिंगणात उतरवून भाजप पडद्याआडून मदत करील. यदाकदाचित जागावाटपावरून युती फिसकटली तर दरोडा हे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग बरोरा हे पक्षांतराच्या पवित्र्यात असल्याची कुणकुण लागताच भारतीय जनता पार्टीच्या शहापूर तालुका कार्यकारिणीची बैठक भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शहापूर येथे अलीकडेच भाजप कार्यालयात झाली होती. त्यावेळी शहापूर विधानसभा मतदारसंघ भाजपला द्यावा, असा ठराव भाजपचे ठाणे विभाग सरचिटणीस काशिनाथ भाकरे यांनी मांडला. त्यास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दिनकर यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे अस्वस्थ असलेले दरोडा व त्यांच्या समर्थकांकरिता भाजपचे दार अगोदरच किलकिले झाल्याची चर्चा आहे. याबाबत गुरुवारी दरोडा यांना विचारले असता ते म्हणाले की, मी अखेरपर्यंत शिवसेनेकडून शहापूर विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. एकनाथ शिंदे हे माझ्यावर अन्याय होऊ देणार नाहीत, असा विश्वास दरोडा यांनी व्यक्त केला. भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देऊ केली तर काय करणार, असा थेट सवाल केला असता दरोडा यांनी या प्रश्नाचे उत्तर असा प्रस्ताव समोर आल्यावरच देऊ, असे सूचक वक्तव्य केले.स्थानिक वादांकडे पवारांचे दुर्लक्षच्आमदार पांडुरंग बरोरा यांचे शरद पवार, अजित पवार तसेच राज्यातील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. मात्र त्यांचे स्थानिक नेत्यांबरोबर व विशेष करून ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस(ग्रामीण)चे अध्यक्ष दशरथ तिवरे यांच्यासोबतचे मतभेद विकोपाला गेले होते.च्अर्थात राज्यातील प्रमुख नेत्यांनी हे वाद मिटवण्याकरिता फारसे काही केले नाही. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सभेला प्रतिसाद न मिळाल्याने संतापलेल्या प्रमोद हिंदुराव यांनी खुर्च्या खाली करण्याचे केलेले विधान हेही बरोरा व राष्ट्रवादीत दुरावा निर्माण करणारे ठरले.च्ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली होती. त्याचा फटका राष्ट्रवादीला बसला होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा लागलेला विपरित निकाल ही धोक्याची घंटा असल्याचे ध्यानात घेऊन बरोरा यांनी भाजप किंवा शिवसेनेमध्ये जाण्याचा विचार पक्का केला.