कल्याण : महाविद्यालयाच्या आवारात दररोज येणारा वाहनांचा कर्णकर्कश आवाजाऐवजी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. शांत, रम्य वातावरणात सेल्फी काढण्याचा मोह विद्यार्थ्यांना आवारता आला नाही. निमित्त होते ते, बिर्ला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विना वाहन दिवसांचे. बिर्ला महाविद्यालयात दररोज 1400 दुचाकी आणि 300 चारचाकी गाडय़ा उभ्या असतात. पण गेल्या चार दिवसांपासून सर्व कार आणि दुचाकी वाहन धारकांना नो व्हेईकल डे विषयी माहिती देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न महाविद्यालयातर्फे करण्यात आला. या जनजागृती मोहिमेला वाहनधारकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी आज खाजगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहनांचा वापर करून महाविद्यालय गाठले. यामुळे वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यास हातभार लावून पर्यावरण संवर्धन होण्यास मदत झाली. महाविद्यालय परिसरात एक ही वाहन नसल्याने परिसर शांत, रम्य, प्रसन्न आणि हिरवाईने नटलेला वाटत होता. विद्यार्थ्यांनी देखील अशा प्रकारचे उपक्रम वारंवार राबविण्याची गरज आहे असे सांगितले. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन बव्रे व त्यांच्या सहकार्याच्या मदतीने राबविण्यात आला होता. कडोमपाच्या परिवहन विभागाने देखील या उपक्रमाला चांगला प्रकारे सहकार्य केले. परिवहन विभागातर्फे कल्याण स्टेशन ते बिर्ला महाविद्यालय आणि बिर्ला महाविद्यालय ते स्टेशन या परिसरात बसेसची संख्या वाढविली होती. परिवहन समितीचे अध्यक्ष संजय पावशे आणि समितीच्या सदस्यांनी महाविद्यालयाला भेट दिली. तसेच उपक्रमांचे कौतुक केले. बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेशचंद्र यांनी अश्याप्रकारचा उपक्रम इतर महाविद्यालयात ही राबविला जावा असे आवाहन केले आहे. तसेच कल्याण शहरात वेगवेगळ्य़ा विभागात टप्प्याटप्प्याने हा उपक्रम राबविण्यात यावा. महाविद्यालयातर्फे दरवर्षी किमान दोन वेळेस विना वाहन दिवस पाळण्यात येईल, असे सांगितले. नितीन बव्रे म्हणाले, विना वाहन दिवस हे पर्यावरण संवर्धनासाठीचे एक पाऊल आहे. इतर सामाजिक संस्था आणि महाविद्यालये यांच्या मदतीने हा उपक्रम संपूर्ण कल्याण शहरात प्रत्यक्षात येऊ शकतो.
बिर्ला महाविद्यालयात विना वाहन दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 17:32 IST