लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासून शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच मनपात भाजपकडील विरोधी पक्षनेतेपद महापौरांनी राष्ट्रवादीकडे सुपूर्द केल्याने भाजपसह काँग्रेस नगरसेवकांच्या पोटात गोळा निर्माण झाला आहे. महापौरांनी केलेली विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती बेकायदेशीर आहे, अशी तक्रार नगरविकासमंत्र्यांकडे केल्यानंतर त्यांच्या आदेशाने मनपा आयुक्तांनी विरोधी पक्षनेतेपदास स्थगिती दिल्याने राजकारण चांगलेच तापले आहे.
शहर विकास वगळता नेहमी या ना त्या राजकीय विषयात चर्चेत असलेल्या भिवंडी महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे नगरसेवक मतलुब अफजल खान ऊर्फ मतलुब सरदार यांची नियुक्ती २२ जानेवारी रोजी झालेल्या महापालिकेच्या महासभेत महापौर प्रतिभा पाटील यांनी केली होती. सरदार यांच्या नियुक्तीवर काँग्रेसचे माजी महापौर जावेद दळवी यांनी आक्षेप घेऊन थेट नगरविकासमंत्र्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन नगरविकासमंत्र्यांनी महापालिकेत महापौरांनी महासभेत केलेली मतलुब खान यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीस स्थगिती दिल्याने मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनीदेखील ही नियुक्ती स्थगित केल्याचे निर्देश प्रशासनासह खान यांना दिले.
आता पुनर्नियुक्तीसाठी राष्ट्रवादीच्या गोताणे यांनी वरिष्ठांकडे धाव घेतली असून त्यासाठी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. तर २२ जानेवारी रोजी झालेली महासभा रद्द केल्याने तीत झालेले इतर विषयही रद्द केले.मग विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीचा विषय कसा मंजूर होऊ शकतो, यावर आपण आक्षेप घेतला होता. आता महापौरांनी विरोधी पक्षनेतेपद जे आमच्याकडे होते ते पुन्हा जाहिर करावे,अशी प्रतिक्रिया माजी विरोधी पक्षनेते यशवंत टावरे यांनी दिली.