कल्याण : घंटागाडीचालकांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कायमस्वरूपी आणि ठोकपगारी वाहनचालकांनी बुधवारी सकाळी कामबंद आंदोलन छेडले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले होते. दरम्यान, प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.मोहने येथील एनआरसी कंपनीने कर थकवल्याने कंपनीच्या आवारात मंगळवारी केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांच्या आदेशानुसार कचरा टाकण्यात आला. या वेळी गैरसमजुतीतून स्थानिक रहिवाशांनी घंटागाडीचालकांना दांडक्यांनी बेदम मारहाण केली. तसेच तीन घंटागाड्यांची तोडफोडही केली. मारहाण होऊनही महापालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न करता केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात धन्यता मानली. मारहाण प्रकरणात स्थानिक शिवसेनेचा पदाधिकारी असल्याने प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली झुकले, असा आरोप चालकांनी केला आहे. मात्र, जोपर्यंत मारहाणप्रकरणी दखलपात्र गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत कचरा वाहून नेणार नाही, असा पवित्रा घेत चालकांनी बुधवारी सकाळी कामबंद आंदोलन छेडले. या आंदोलनात महापालिकेचे ७५ तसेच १०५ ठोकपगारी वाहनचालक सहभागी झाले होते. वाहनचालकांच्या या आंदोलनामुळे सकाळच्या सुमारास कचरा उचलला गेला नाही. त्यामुळे शहरातील कचराकुंड्या तुडुंब भरून वाहत होत्या.दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच ‘अ’ प्रभागाचे सुनील पाटील, ‘ब’ प्रभागाचे सुहास गुप्ते आणि ‘क’ प्रभागाचे अरुण वानखेडे या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करीत नाही, तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही, या भूमिकेवर चालक ठाम होते. यावर, चालकांना शिस्तभंग कारवाईची भीतीही घालण्यात आली. त्यानंतरही आंदोलन सुरूच राहिल्याने अधिकारी गुन्हा दाखल करण्यास तयार झाले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होताच चालकांनी आंदोलन मागे घेत कचरा उचलण्यासाठी वाहने बाहेर काढली. दरम्यान, मारहाण केल्याच्या आरोपाखाली पप्पू कांबळे व विनोद सोनवणे यांच्याविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विनोद ठाकरे यांनी फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)
घंटागाडीचालकांचे ‘कामबंद’
By admin | Updated: March 23, 2017 01:22 IST