ठाणे : प्रशासकीय सेवेत मोठमोठ्या हुद्यांवर कार्यरत असलेले प्रथम वर्ग अधिकारी येथील ‘बाराबंगला’ परिसरातील बंगले व इमारतींमध्ये राहत आहेत. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या निवासी इमारती व बंगल्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे या अधिकाऱ्यांच्या गृहिणींनी कोपरी पोलिसांना सुरक्षेसाठी लेखी स्वरूपात साकडे घातले आहे. ‘काहीतरी कर ठाणेकर’ या वृत्तमालिके द्वारे लोकमतने या आधी ‘बाराबंगला’ परिसरातील इमारतींच्या समस्या उघड केलेल्या आहेत. पण, अद्यापही त्याकडे लक्ष देण्यास बांधकाम विभागाला वेळ नसल्यामुळे समस्या गंभीर होऊन अधिकारी व त्यांच्या परिवारास त्या घातक ठरत आहेत. या परिसरातील शरावती इमारतीला बुधवारी सकाळी ७ वाजता अचानक आग लागून धुराचे लोट परिसरात पसले होते. या आगीदरम्यान वरच्या मजल्यावर रहिवासी जीव मुठीत घेऊन होते. या आगीच्या ज्वाला व धुरांचे लोट अनुभवलेले रहिवासी भेदरले असून त्यांची प्रकृती बिघडलेली आहे.या इमारतीच्या तळ मजल्यावरील विद्युत मीटर बॉक्स जळून ही आग लागली होती. या ठिकाणी एक अज्ञात व्यक्ती रहिवाशांना आढळून आली. तिच्यामुळे या ठिकाणी असलेले कारर्पेंटाइल व रंगाच्या डब्याने आग लागून ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करीत त्यास बांधकाम विभागाचा दुर्लक्षितपणा कारणीभूत आहे. (प्रतिनिधी)
सुरक्षेअभावी बाराबंगला वसाहत निवाऱ्यास घातक
By admin | Updated: February 6, 2017 04:26 IST