बदलापूर : बदलापुरातील नाट्यरसिकांसाठी प्रशस्त नाट्यगृह उभारण्याकरिता शासनाने निधीची तरतूद केली आहे. मात्र, नाट्यगृहासाठी शासकीय जागा अपुरी पडत असल्याने त्याला लागून असलेली खाजगी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग येत नसल्याने नाट्यगृहाचे काम होणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या विशेष सभेत नाट्यगृहाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊनही नाट्यगृहाच्या उभारणीच्या पुढील कार्यवाहीस विलंब होत असल्याबाबत भाजपाचे संभाजी शिंदे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. भाजपाचेच संजय भोईर, किरण भोईर व शिवसेनेचे शैलेश वडनेरे यांनीही त्यांच्या या मागणीला समर्थन दिले. त्यानंतर, नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनीही प्रशासनाला माहिती देण्याचे निर्देश दिले. सहायक नगररचनाकार सुदर्शन तोडणकर व नगर अभियंता चिंद्रे यांनी सांगितले की, बदलापूर पूर्वेकडील कात्रप भागात असलेली शासकीय जागा नाट्यगृहासाठी पुरेशी नसल्याने खाजगी जागा संपादित करून खाजगी व शासकीय जागेवर मिळून नाट्यगृहाची इमारत उभारावी लागणार आहे. खाजगी जागा संपादित करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यासाठी मागितलेल्या २२ मुद्यांची माहिती त्यांना पाठवण्यात आली आहे. त्यानंतर, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात एक बैठक झाली असून लवकरच दुसरी बैठक होणार असल्याचे तोडणकर यांनी सांगितले. शासकीय जमिनीसंदर्भातही त्यांनी तहसीलदारांकडे अहवाल मागितला असून जमिनीची मोजणी झाल्यावर हा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानुसार, नगर परिषदेला पुढील कार्यवाहीचे आदेश मिळणार असल्याचे तोडणकर यांनी स्पष्ट केले. नाट्यगृहासाठी शासनाकडून नगर परिषदेला जमीन मिळणार असली, तरी ती विनामूल्य असणार नाही. त्यासाठी शासकीय दराने शुल्क भरावे लागणार असल्याचेही तोडणकर यांनी स्पष्ट केले. शासकीय भूखंडालगत असलेल्या खाजगी जमिनी संपादित करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
बदलापूरचे नाट्यगृह भूसंपादनाअभावी रखडले
By admin | Updated: December 23, 2016 03:02 IST