ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवाटपात हस्तक्षेप करून पक्षविरोधी काम करणाऱ्यांना उमेदवारी दिल्याच्या आरोप करून कळवा येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नाईक यांच्यामुळेच निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. केवळ एकाच प्रभागात दोघांना एबी फॉर्म दिल्यावरून हा गोंधळ उडाला असला, तरी या ठिकाणी आव्हाड विरुद्ध नाईक असाच काहीसा संघर्ष दिसला.राष्ट्रवादीने प्रभाग क्र मांक २४ क मधून जितेंद्र पाटील आणि अक्षय ठाकूर, तर प्रभाग क्र मांक २५ क मधून रीटा यादाव आणि वर्षा मोरे यांना अधिकृत उमेदवारीचे एबी फॉर्म दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ठाण्याचे संपर्क नेते गणेश नाईक आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अंतर्गत कलहामुळेच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. त्यावरून बराच संघर्ष झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नाईक गटाच्या अक्षय ठाकूर, तर आव्हाड गटाच्या वर्षा मोरे यांना अधिकृत उमेदवारी मिळाल्याचे जाहीर केले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली यादी जाहीर केली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत यादी अद्यापही जाहीर केलेली नाही. पक्षातर्फे अनेकांना एबी फॉर्म दिले असले, तरी अनेक ठिकाणी नाईक यांच्यामुळे चुकीचे उमेदवार लादण्यात आल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. कळव्यातील काही प्रभागांमध्ये त्यांनी दबावतंत्र वापरून आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. या कार्यकर्त्यांनी शनिवारी कळवा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर गणेश नाईक यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. यासंदर्भात प्रदेशाध्यक्षांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. आव्हाड यांच्या गटाने जितेंद्र पाटील आणि वर्षा मोरे यांची उमेदवारी पक्षश्रेष्ठींकडून मंजूर करून घेतली असताना त्याच जागांवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अक्षय ठाकूर आणि रीटा यादव यांनासुद्धा पक्षाचा एबी फॉर्म दिल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण, यावरून कळव्यात प्रचंड वादंग झाला. मोरे आणि पाटील यांनी अर्ज सादर केल्यानंतर शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या अधिकृत पत्रासह पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिले होते. तर, अन्य दोघांनी अर्जासोबतच ते प्रदेशाध्यक्षांचे पत्र जोडले होते. कोणता उमेदवार अधिकृत आहे, हे ठरवताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा कस लागला. अखेर रीटा यादव आणि जितेंद्र पाटील यांचे अर्ज बाद करून ठाकूर आणि मोरे हे पक्षाच्या अधिकृत निवडणूक चिन्हावर लढू शकतील, असा निर्णय त्यांनी दिला. एकूणच आता उमेदवारीचा मुद्दा जरी संपुष्टात आला असला तरीदेखील राष्ट्रवादीमध्ये असलेली गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. (प्रतिनिधी)
कळव्यात आव्हाड आणि नाईक समर्थक भिडले
By admin | Updated: February 5, 2017 03:04 IST