ठाणे : एकतर्फी प्रेमातून ठाण्याच्या खारटन रोड भागातील २२ वर्षीय तरुणीच्या घरात रॉकेलचा बोळा फेकून तिचे घर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रितेश मेहरुल (२७) याला ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ठाणे न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. त्याने घर पेटविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा घरात तरूणीसह नऊ जण होते. सुदैवाने शेजारी आणि ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग वेळीच आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला.मुंबईच्या वडाळा भागात वास्तव्याला असलेली ही तरूणी ठाण्यात खारटन रोड भागातील तिच्या मामाकडे काही दिवसांपूर्वी आली होती. आरोपी रितेश विवाहित असून, त्याने तरूणीच्या आई वडिलांकडे तिच्यासोबत लग्न करण्याकरिता मागणी घातली होती. पण, त्याचे आधीच लग्न झाल्याचे समजल्यानंतर तरूणीने आणि तिच्या नातेवाईकांनी त्याला स्पष्ट नकार दिला. तरीही तो तिच्या मागे लागला होता. यापूर्वीही त्याने तिचे दोनदा लग्न मोडले. पुन्हा त्याने तसाच प्रकार केल्यामुळे तरूणीच्या आई-वडिलांनी आणि मामांनी त्याच्या वडिलांकडे याबाबत सोमवारी तक्रार केली होती. ‘मुलाला आम्ही समज देतो,’ असे मुलाच्या वडिलांनी तरूणीच्या नातेवाईकांनाही सांगितले. त्यामुळे सर्व निवळले, असे समजून खारटन रोड येथील घरीच तरूणीच्या आई वडिलांसह काही नातेवाईक सोमवारी मुक्कामी थांबले. मंगळवारी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास या घराच्या एक्झॉस्ट फॅनच्या पोकळीच्या जागेत रॉकेलचा पेटता बोळा फेकून त्याने घर पेटवण्याचा प्रयत्न केला. या बोळयाने घरातील काही कपडे आणि प्लास्टिकच्या डब्यांनी पेट घेतला. सुदैवाने वेळीच तरूणीच्या आईच्या निदर्शनास हा प्रकार आल्याने तिने आरडाओरड करताच शेजा-यांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. तोपर्यंत ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी पोहोचून आग पूर्णपणे आटोक्यात आणली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.---------------
ठाण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीचे घर पेटविण्याचा प्रयत्न: आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:20 IST
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून रितेश मेहरुल या विवाहित तरुणाने खारटन रोड येथील एका तरुणीच्या नातेवाईकाच्या घरात पेटता बोळा फेकून घर जाळण्याचा प्रयत्न केला. त्याला ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे.
ठाण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीचे घर पेटविण्याचा प्रयत्न: आरोपीस अटक
ठळक मुद्दे घरात फेकला पेटता बोळासोमवारी समजूत घालूनही केला हल्लाठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल