ठाणे : महासभेत अधिकाऱ्यांविरोधात आम्ही बोललोच नाही, असा दावा करून त्यांना भाजपा आणि राष्ट्रवादीच्या मंडळींनी टार्गेट केल्याचा आरोप सेनेने केला असतानाच, भाजपा आणि राष्ट्रवादीनेही आम्ही अधिकाऱ्यांना टार्गेट केले नसल्याचे सांगत इतिवृत्त तपासा, म्हणजे विरोधात कोण बोलले, हे स्पष्ट होईल, असा दावा करून सेनेवर निशाणा साधला आहे. परंतु, या तिन्ही पक्षांतील नगरसेवकांनी जर अधिकाऱ्यांना टार्गेट केले नाही, तर मग त्यांनी नाराजी कशासाठी आणि कोणत्या कारणासाठी व्यक्त केली, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अर्थसंकल्पात प्रशासनाने सुचवलेली करवाढ सर्वपक्षीय नगरसेवकांनी फेटाळून लावल्याने उत्पन्नात ४७० कोटींचा खड्डा पडण्यासोबतच नव्याने एकही विकासकाम हाती घेता येणार नाही. त्यानंतरही शेलक्या शब्दांत आमचा उद्धार होणार असेल, तर आम्ही राजीनामे देतो. अशा भावना मांडून अनेक अधिकाऱ्यांनी शिवसेनेचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. या बजेटच्या चर्चेनंतर अधिकारी व्यथित झाल्यानंतर याचे खापर सेनेवर फोडत असल्याने त्यांनी देखील सावध भूमिका घेऊन महासभेत आम्ही अधिकाऱ्यांच्या किंवा आयुक्तांच्या विरोधात काही बोललोच नसल्याचा दावा केला आहे. सेनेने घेतलेल्या या भूमिकेमुळे आता राष्ट्रवादी आणि भाजपा संकटात सापडल्याने या दोनही पक्षांतील नेत्यांनी सावध भूमिका घेत आम्ही देखील महासभेत प्रशासनाच्या बाजूनेच बोललो होतो. आयुक्तांच्या कामांचे कौतुक केल्याचे सांगितले. सेनेची मंडळी अधिकाऱ्यांवर तोंडसुख घेत असल्याचा आरोपही या दोन्ही पक्षांनी केला आहे. सेनेच्या काही नगरसेवकांनी, तर अधिकारी जुमानत नसल्याचा आरोप केला होता. आम्ही जर खोटे बोलत असू, तर मीटिंगचे इतिवृत्त तपासा, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल, असेही सुनावले आहेत. आयुक्तांना अंगावर घ्या... आयुक्त आणि त्यांच्याबरोबरच्या अधिकाऱ्यांचे अति झाले असून आता गप्प बसायचे नाही. आयुक्तांना अंगावर घेण्याची वेळ आल्याची चर्चा बजेट मीटिंगच्या आधीच झाली होती, अशी माहिती आता समोर येत असून यावर ज्येष्ठ सेना नगरसेवकांनी शिक्कामोर्तब केल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. परंतु, जे चांगले असेल ते चांगलेच म्हणू आणि जे वाईट असेल त्या ठिकाणी प्रशासनाची कानउघाडणीदेखील करू, अशी भूमिका राष्ट्रवादीने या बैठकीतही घेतली होती, अशी माहितीही राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)आम्ही केवळ अधिकाऱ्यांना देण्यात येत असलेल्या अतिरिक्त कारभारावरूनच महासभेत बोललो होतो. परंतु, अधिकारी किंवा आयुक्त काम करीत नाहीत, असे आम्ही बोललेलोच नाही. मागील दोन वर्षांत ठाण्याच्या विकासात आयुक्तांमुळे भरच पडली आहे. - मिलिंद पाटील, विरोधी पक्षनेते - ठामपाप्रशासनाविरोधात आम्ही बोलण्यापेक्षा कोण बोलले आहे, हे इतिवृत्त तपासल्यास चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे शिवसेनेने आमच्यावर आरोप करणे चुकीचे आहे.- संजय वाघुले, नगरसेवक, भाजपा
सेनाच दोषी, भाजपा-राष्ट्रवादीचा हल्ला
By admin | Updated: May 5, 2017 06:02 IST