कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक ८ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता होणार आहे. त्यासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. युतीतील वाटाघाटीनुसार सभापतीपद भाजपाच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे भाजपा सभापतीपदासाठी कोणाला संधी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महिला बालकल्याण समितीच्या ११ सदस्यांमध्ये शिवसेना गटाचे ५, भाजपाचे ४, तर काँग्रेस आणि मनसेचा प्रत्येकी १ सदस्य आहे. २६ डिसेंबरला केडीएमसीच्या विशेष महासभेत महिला बालकल्याणची नवीन समिती स्थापन झाली. या वेळी गटनेतेपदाच्या वैधानिक दर्जाचा मुद्दा उपस्थित करीत मनसेने या समितीसाठी त्यांच्या सदस्याचे नाव दिले नाही. त्यामुळे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी १० जणांच्याच नावाची घोषणा केली आहे.नव्या समितीमध्ये नीलिमा पाटील, प्रियंका भोईर, शीतल भंडारी, ऊर्मिला गोसावी, वैशाली भोईर (सर्व शिवसेना आघाडी गट), वैशाली पाटील, रेखा चौधरी, इंदिरा तरे, वृषाली पाटील-जोशी (सर्व भाजपा, कल्याण-डोंबिवली विकास आघाडी), तर काँग्रेसच्या हर्षदा भोईर यांचा समावेश आहे. या समितीवर भाजपाने वैशाली पाटील यांना पुन्हा संधी दिल्याने त्याच सभापतीपदासाठी प्रमुख दावेदार असल्याची सूत्रांची माहिती आहे.सभापती पदाच्या निवडणुकीसाठी कोकण विभागीय आयुक्तांनी ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांची पीठासीन अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. परंतु, समिती पूर्णपणे स्थापन न झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत मनसेने या निवडणुकीला हरकत घेतल्याने ही निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)शिवसेनाही उमेदवारी अर्ज दाखल करणार?महापालिकेच्या कार्यालयीन वेळेत शनिवारी सभापतीपदासाठी अर्ज दाखल करावयाचे आहेत. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुटलेली युती पाहता स्थानिक पातळीवर शिवसेनाही उमेदवारी अर्ज दाखल करते का, हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
सभापतीपदासाठी आज अर्जस्वीकृती
By admin | Updated: February 4, 2017 03:34 IST