विक्रमगड : विक्रमगड डोल्हारी (बु.) ग्रामपंचायत निवडणुक २०१६ वॉर्ड क्र. २ (ब) येथे रामचंद्र पांडूरंग भेरे व संतोष मगळ्या गुरोडा यांनी नामनिर्देशन पत्रासोबत शौचालयाचे खोटे दाखले सादर केल्याचा आरोप करण्यात येऊनही याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची तक्रार माकपाचे किरण गहला यांनी निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे. रामचंद्र भेरे व संतोष गुरोडा यांनी ग्रामपंचायतीची दिशाभूल करून खोटे शौचालय दाखले सादर केल्याने त्वरीत पंचनामे करून त्यांची शहानिशा करावी जेणेकरून निवडणुक कायद्याचा भंग होणार नाही असे गहला यांचे म्हणणे आहे. बऱ्याचदा निवडणुक जिंकल्यावर शौचालय बांधण्याचा पराक्रम करतात हे सोपस्कार कायद्यात बसत नसल्याने त्यांचे अर्ज बाद होणे गरजेचे होते. तशा प्रकारचे पुरावेही देण्यात आले होते. परंतु निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी या पुराव्याकडे लक्ष न देता त्याचे अर्ज कायम ठेवण्यात आले. याबाबत सर्व शासकीय आस्थापनामध्ये तक्रारी करण्यात आली असून संबंधीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)
उमेदवारी अर्जाची छाननी योग्य न झाल्याचा आरोप
By admin | Updated: April 11, 2016 01:15 IST