पंकज पाटील, अंबरनाथ अंबरनाथ तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत शिवसेना विरुध्द भाजपा अशीच लढत झाली आहे. निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करतांना शिवसेनेने युतीचा धर्म न पाळता परस्पर निर्णय घेतले. तेव्हा त्यांना युतीधर्म आठवला नाही. आता विधान परिषदेच्या निवडणुकीवेळीच का आठवला, अशी टीका करत भाजपाच्या गोटातील नगरसेवकांनी शिवसेनेवर विश्वासघाताचा आरोप केला आहे. युतीतील या वादाचा परिणाम विधान परिषदेच्या निवडणुकीवर होण्याची भीती आहे. भाजपाला विश्वासात घेत नसल्याने या निवडणुकीत वेगळ्या विचाराने निर्णय घेण्याची शक्यताही त्या पक्षाच्या नगरसेवकांनी व्यक्त आहे. कुळगांव-बदलापूर नगरपालिकाते सत्ता स्थापन करतांना भाजपाने युतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र शिवसेनेने तो प्रस्ताव फेटाळत स्वबळावर सत्ता स्थापन केली. असाच प्रकार अंबरनाथमध्येही घडला. अंबरनाथमध्ये सत्तेची गणिते रचतांना शिवसेनेने भाजपाला बाजुला सारुन राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीला सत्तेचा भागीदार करित भाजपाला टाळण्याचा प्रयत्न केला. या दोन घटनांसोबतच अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीची निवडणूक ही दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. त्यातही सत्ता स्थापन करतांना भाजपाला बाजुला सारुन शिवसेनेने सत्ता स्थापन केली. अंबरनाथ तालुक्यात तिन्ही निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला बाजुला सारले. त्याचा संताप भाजपा नेत्यांत आहे. हाच राग येत्या विधान परिषदेच्या निवडणुकीत निघण्याची शक्यता आहे. वरवर ‘युतीचा धर्म पाळा’ असा संदेश असला तरी स्थानिक पातळीवर नगरसेवकांचा शिवसेनेला विरोध दिसत आहे. हा विरोध शमविण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.
शिवसेनेवर भाजपाचा विश्वासघाताचा आरोप
By admin | Updated: May 22, 2016 01:38 IST