हितेन नाईक, पालघरपालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील लिपीक तसेच टंकलेखक पदभरतीच्या १३४ जागांसाठी रविवारी पुन्हा दुसऱ्यांदा झालेल्या परीक्षेमध्येही टॅप्स केंद्र, तारापूरमध्ये मोबाइल नेऊन त्याद्वारे उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या संगीता नारायण सुराडकर (३०), रा. जालना व वसईतील जी.जे. हायस्कूल केंद्रातील अरुण श्यामराव गवळी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले होते.पालघर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत ४ आॅक्टोबरला ५७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. परंतु, या परीक्षा केंद्रांपैकी पालघरमधील आर्यन शाळा परीक्षा केंद्रावर मोबाइल घेऊन त्याद्वारे प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण करणाऱ्या दोन परीक्षार्थ्यांना पालघर पोलिसांनी अटक केली होती. हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर आणखी दोन अशा चौघांना अटक करण्यात आली होती. यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय असल्याने त्या दिशेने स्थानिक गुन्हे शाखेने आपल्या तपासाची चक्रे फिरवली होती. या परीक्षेत जास्त प्रमाणात पेपर लीक होण्याची शक्यता पाहता जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ४ आॅक्टोबरची परीक्षा प्रक्रिया रद्द करून १८ आॅक्टोबर रोजी पुन्हा परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते व त्यादृष्टीने या वेळी पालघर, बोईसर, वसई येथील ६० केंद्रांवर कडक बंदोबस्त ठेवला होता. या परीक्षेसाठी २४ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. त्यापैकी १५ हजार ७८३ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. तर, ९ हजार १८१ विद्यार्थी अनुपस्थित राहिले होते.सर्व परीक्षा केंद्रांवर जिल्हा प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता. एकूण ६० केंद्रांवर प्रत्येकी ६ पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती. पाण्याची बाटली, पर्स, घड्याळ अशी कुठलीही वस्तू परीक्षा केंद्रात नेण्यास बंदी असूनही तारापूर टॅप्स केंद्रावरील परीक्षार्थी संगीता सुराडकर या महिलेने अंतर्वस्त्रामध्ये मोबाइल नेला. त्याचा वापर करीत असताना पर्यवेक्षकांनी तिला पकडले. तर, वसईमधील जी.जे. वर्तक हायस्कूल केंद्रामध्ये मोबाइल नेणाऱ्या अरुण गवळी या परीक्षार्थ्यालाही पर्यवेक्षकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.हे दोघेही आरोपी नातेवाईक असल्याचे कळते. यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून महाराष्ट्र विद्यापीठ व इतर परीक्षेमध्ये होणाऱ्या गैरव्यवहार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुन्हा पेपर फोडण्याचा प्रयत्न
By admin | Updated: October 19, 2015 01:04 IST