कल्याण : पश्चिमेतील जोशी बागेतील एम.जे.बी. शाळेने दहावीचा वर्ग भरवल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी शाळेच्या विरोधात कारवाई केली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढत असल्याने मास्कचा वापर करणे तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची सक्ती महापालिका प्रशासनाने केली आहे. राज्यात मिनी लॉकडाऊन सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व शाळाही बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. असे असताना एम.जे.बी. शाळेत दहावीचा वर्ग भरला होता. याबाबतची माहिती मिळताच प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे तेथे पोहोचले. यावेळी वर्गातील विद्यार्थिनी बाहेर पडल्या. त्यातील काहींच्या तोंडावर मास्कही नव्हतेे. त्यामुळे महापालिकेने शाळेच्या विरोधात कारवाई केली आहे.
याबाबत शाळा व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, दहावीची परीक्षा असल्याने विद्यार्थिनींना एका दिवसासाठी शाळेत बोलविले होते. दरम्यान, हा वर्ग दररोज भरविला जात असल्याची कुजबुज शाळेच्या परिसरात ऐकावयास मिळाली.
-----------------------------