मुंब्रा : मध्य प्रदेशातील इंदूर येथे झालेल्या भीषण अपघातात मुंब्य्रातील एकाच कुटुंबातील सहा जणांसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला. यामुळे शुक्र वारी या भागात शोककळा पसरली होती.येथील अमृतनगर भागात राहणारे इमारत विकासक मेहफूज खान यांचे वडील आजारी आहेत. त्यांची वैद्यकीय चौकशी करण्यासाठी खान, त्यांची पत्नी, मावशी आणि मुलगा सदफ, हैदर तसेच १० वर्षांची मुलगी खासगी वाहनाने उत्तर प्रदेशातील त्यांच्या गावी चालले होते. पहाटे ४ वाजता त्यांच्या वाहनाने इंदूरजवळ बसला धडक दिली. त्यामुळे वाहनातील खान यांच्या कुटुंबातील सहा जण व वाहनचालक युसूफ याचा घटनास्थळावर मृत्यू झाला. खान कुटुंबीयांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार असून, चालक युसूफ याचे शव मुंब्य्रात आणण्यात येणार असल्याची माहिती खान यांचे निकटवर्तीय सुल्तान रिझवी यांनी दिली.
मुंब्य्रातील सात जणांचा अपघाती मृत्यू
By admin | Updated: February 20, 2016 03:03 IST