ठाणे : महिनाभरापूर्वी ठाण्यात रुग्णाला बेड मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. परंतु, आता काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने शहरातील विविध रुग्णालयांतील तब्बल ७७ टक्के बेड रिकामे असल्याची माहिती समोर आली आहे. केवळ २३ टक्के बेडवर रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील ९६ टक्क्यांवर गेले आहे.
महापालिका हद्दीत एक ते दीड महिन्यापूर्वी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. रोजच्या रोज पंधराशे ते अठराशे रुग्ण आढळत होते. परंतु, आता ती संख्या १०० ते २०० च्या घरात आली आहे. त्यातही रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील ८३ टक्क्यांवरून ९६ टक्क्यांच्या वर गेल्याने शहरातील विविध रुग्णालयांत बेड रिकामे राहू लागले आहेत. एक महिन्यापूर्वी प्रत्यक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १२ हजार ९८३ एवढी होती. परंतु, आता तीच संख्या दोन हजार १५० एवढी झाली आहे. यातील एक हजार २४२ रुग्ण हे शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यातील ६७८ रुग्ण हे घरीच विलगीकरणात आहेत. एकूण रुग्णालयातील ८७६ रुग्णांना कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत, तर ८६३ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळली आहेत. ३६६ रुग्ण हे अत्यवस्थ आहेत. २०६ रुग्ण आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत. १६० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे एकूण ५ हजार ४४८ बेडपैकी केवळ एक हजार २४२ बेड फुल्ल असून, ४ हजार २०६ बेड विविध रुग्णालयात उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार शहरात सध्याच्या घडीला केवळ ७७ टक्के बेड शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. यात जनरलचे एक हजार ४४६ बेडपैकी २२८ बेड फुल असून, त्यातील एक हजार २१८ बेड शिल्लक आहेत. ऑक्सिजनचे दोन हजार ९१०पैकी ६४८ बेड फुल असून, दोन हजार २६२ बेड शिल्लक आहेत. याचाच अर्थ ऑक्सिजनचे ७८ टक्के बेड शिल्लक आहेत. आयसीयुच्या एक हजार ९२ पैकी ३६६ बेड फुल असून, आता ७२६ बेड शिल्लक आहेत. हे प्रमाण ६६ टक्के एवढे आहे. व्हेंटिलेटरचे ३४२पैकी १६० बेड फुल असून, १८२ बेड शिल्लक असल्याची माहिती महापालिकेने दिली.
दरम्यान, महापालिकेने बेडची उपलब्धता वाढविली असून, त्यामुळेदेखील बेड रिकामे राहू लागले आहेत.