ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचा दावा ठाणे महापालिका प्रशासनाने केला होता; परंतु तो कुठेतरी फोल ठरताना दिसत आहे. तब्बल ११ तास रुग्णवाहिका न मिळाल्याने अखेर कोरोनाबाधित ७६ वर्षीय वृद्धाला चक्क रिक्षातून रुग्णालय गाठावे लागल्याची गंभीर बाब समोर आली होती. त्यानंतर आता कोरोनाबाधितांना एक तासाच्या आत रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, या उद्देशाने तब्बल ६५ रुग्णवाहिका महापालिकेने सेवेत दाखल केल्या आहेत. त्यामुळे रुग्णाला कमीत कमी वेळेत ती उपलब्ध होऊ शकणार आहे.
यातील ६५ पैकी ६ कार्डियाक रुग्णवाहिका असून, ११ ऑक्सिजन, बेसिक ६, अँटिजन १७ (टीएमटी बसेस) आणि २५ कारचा समावेश आहे.
ठाण्याच्या चंदनवाडी येथे राहणाऱ्या एका ७६ वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना तब्बल ११ तास रुग्णवाहिकेसाठी ताटकळत राहावे लागल्याची घटना ४ एप्रिल रोजी घडली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णवाहिका वेळेत मिळावी या उद्देशाने ६५ रुग्णवाहिका सेवेत दाखल केल्या आहेत. त्यानुसार आता एखाद्याला ती हवी असल्याने त्याने संपर्क साधल्यानंतर अवघ्या एक तासाच्या आत त्याला ती उपलब्ध होईल, असा दावा महापालिकेने केला आहे. तो किती दिवस रुग्णांसाठी लागू ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.