ठाणे : एकीकडे लोहमार्ग पोलिसांची आठ तासांची ड्युटी झाली असताना दुसरीकडे त्यांच्या मदतीला असलेल्या होमगार्डची फौज कमी झाल्यामुळे ठाणे लोहमार्ग पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. आता नव्याने होणाऱ्या पोलीस भरतीतून किती पोलीस मिळतील, याकडे आता जीआरपी पोलिसांचे लक्ष लागून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे लोहमार्ग पोलिसांची कोपरी ते दिवा आणि दिवा ते अशी हद्द विखुरली आहे. त्यात, ठाणे ते दिवा दरम्यानच्या चार रेल्वेस्थानकांत दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. ठाणे रेल्वेस्थानकातून सुमारे सात ते आठ प्रवासी दररोज येजा करतात. तसेच मध्य रेल्वेच्या ७८२ अपडाउन लोकलसह ठाणे-वाशी-पनवेलवर २८२ अपडाउन तसेच ८० अप आणि ७० डाउन अशा एक्स्प्रेस धावतात. त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ठाणे लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफवर आहे. जीआरपीच्या हद्दीत गतवर्षात घडलेल्या चोरीच्या घटनांची संख्याही जवळपास चार हजारांच्या घरात आहे. जीआरपीची एकूण मंजूर पदे २०२ इतकी असून त्यापैकी १९० इतके पोलीस अधिकारी-कर्मचारी रुजू आहेत. त्यातील ४०-४५ जणांपैकी काही जण प्रतिनियुक्तीवर, आजारपणाच्या सुटीवर, गैरहजर, काही महिला प्रसूती रजेवर गेल्याने अवघे १५० इतक्या पोलिसांवर सर्व जबाबदारी असते. मध्यंतरी, त्यांच्या जोडीला ६० होमगार्ड आणि २० जण सुरक्षा फोर्सचे जवान होते. ते रेल्वे फलाट, लोकलच्या महिला डब्यात आदी सुरक्षिततेची कामे करत होती. तीच ६० जणांची होमगार्डची फौज कमी केल्यामुळे रेल्वेफलाटांवर आणि लोकलच्या महिला डब्यात होमगार्डच्या जागी आता जीआरपीवर बंदोबस्ताची वेळ आली आहे. त्यामुळे सुरक्षिततेबरोबरच, चोरीच्या घटना रोखण्यासाठी जीआरपी पोलिसांना डोळ्यांत तेल घालून पहारा द्यावा लागत आहे. होमगार्ड कमी केल्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी यापूर्वी भरती झालेले किंवा नवीन भरतीतून किती कर्मचारी मिळतात, याकडेच याची वाट बघण्याशिवाय जीआरपीसमोर पर्याय नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.महिला डब्यात आता पोलीसमहिला सुरक्षिततेसाठी लोकलच्या महिला डब्यात यापूर्वी खाकी वेशातील होमगार्ड दिसत होते. त्यांच्याजागी आता ठाणे लोहमार्ग पोलीस दलातील ३०-३२ पोलीस सध्या तैनात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
६० होमगार्ड कमी केल्याने जीआरपीवर वाढतोय ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:00 AM