डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेत (केडीएमटी) जेएनएनयूआरएम अंतर्गत मंजूर झालेल्या १८५ बसपैकी ६० बस दाखल झाल्या आहेत. परंतु, केवळ चालक-वाहकांअभावी त्या धुळखात पडल्या आहेत. या बसच्या विम्यापोटी सुमारे २५-३० लाख रुपये भरण्यात आले आहेत. त्यात तांत्रिक त्रुटी आहेत. त्यामुळे संबंधित परिवहन अधिकाऱ्यांची चौकशी करावी. त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर ठोस कारवाई करावी, असे मागणी करणारे पत्र परिवहन सभापती भाऊ चौधरी यांनी बुधवारी महापौर राजेंद्र देवळेकर यांना दिले आहे.चौधरी म्हणतात की, ८ आॅगस्ट २०१५ ला केडीएमटीच्या ताफ्यात ६० बस आल्या. त्या अजूनही मेट्रा जंक्शन मॉलनजीक परिवहनच्या भूखंडावर धुळखात पडून आहेत. त्यातच लवकरच ११५ बस येण्याच मार्गावर आहेत. २८ डिसेंबर २०१५ मध्येच महापौरांनी चालक-वाहक भर्तीचे आदेश दिले होते. परिवहन समितीनेही ठोक पगारावर भरतीला संमती दिली आहे. मात्र भरती झालीच नसल्याने त्या बस रस्त्यांवर धावण्याऐवजी १० महिन्यांपासून तेथे पडून आहेत. त्या बसद्वारे परिवहन-महापालिकेला कोणतेही उत्पन्न मिळत नाही. उलट त्यांच्या विम्यापोटी परिवहन उपक्रमाला २५-३० लाख खर्च करावे लागले आहेत. या नुकसानीला जबाबदारी कोण, हे निश्चित करावे. तसेच दोषी अधिकाऱ्यांकडून भरपाई वसूल करावी. त्यांच्यावर ठोस कारवाई करण्याची मागणी चौधरी यांनी केली.
केडीएमटीच्या ६० बस पडल्या धूळखात
By admin | Updated: June 21, 2016 01:11 IST