बदलापूर : एका कंपनीच्या नावाने दोन बनावट चेक तयार करून त्यावर अधिकाऱ्यांच्या हुबेहूब सह्या करून त्या दोन चेकद्वारे बदलापूर पूर्वेकडील भारतीय स्टेट बँक आणि आरबीएल बँक या दोन बँकांना ५ लाख ७३ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे.बदलापूर पश्चिमेकडे राहणारा हरीश पटेल याचे भारतीय स्टेट बँक औद्योगिक वसाहत येथे बचत खाते आहे. हरीश याने भारतीय स्टेट बँक, औद्योगिक वित्त, नागपूर शाखेचा मे. गंगा आर्यन अॅण्ड स्टील ट्रेडिंग कंपनी लिमिटेडच्या नावे असलेल्या खाते क्रमांकाचे २ बनावट चेक तयार केले. त्यावर, अधिकाऱ्यांच्या सहीप्रमाणे हुबेहूब सही करून त्यावर दिनांक आणि रक्कम लिहिली. ते दोन चेक बनावट असल्याची माहिती असूनही स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी भारतीय स्टेट बँकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने पे स्लीप भरून ३ लाख ८१ हजार ७२० रुपयांचा बनावट चेक बँकेत भरला. त्यापैकी २ लाख ८० हजारांची रोख रक्कम, एटीएम, पॉस मशीन व दुसऱ्या शाखेतील कॅश काउंटरवरून चेकद्वारे काढून फसवणूक केली. तसेच बदलापूर पूर्वेकडील आरबीएल बँक लिमिटेड येथेही पटेल याचे खाते असून त्या बँकेतसुद्धा त्याने १ लाख ९१ हजार ३३८ रुपयांचा बनावट चेक खात्यात जमा होताच त्यातून ५० हजारांची रक्कम काढून घेत त्या बँकेचीसुद्धा फसवणूक केली. हा प्रकार भारतीय स्टेट बँकेच्या लक्षात येताच त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात हरीश पटेल याच्याविरुद्ध दोन बँकेच्या बनावट चेकद्वारे फसवणूक केल्याची तक्र ार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)
बनावट चेकद्वारे दोन बँकांना ५.७३ लाखांचा गंडा
By admin | Updated: December 26, 2016 07:17 IST