अनिकेत घमंडी, डोंबिवलीझोपडी परिसरच नाही, सर्वत्र इमारती असून त्यात फारसे काही करण्यासारखेच नव्हते, असा दावा करणाऱ्या नगरसेवक अमित सुलाखे यांना राम मंदिरनजीक रस्त्यालगतचा अर्धवट नाला बंदिस्त करायला पाच वर्षे लागली असून अद्यापही त्याचे काम झालेले नाही. तसेच तो बंदिस्त झाल्यानंतर त्यावर काय करायचे, याचेही नियोजन त्यांच्याकडे नाही. त्यामुळे ५ लाखांचा निधी केवळ स्लॅब टाकण्यासाठीच वापरत असल्याची टीका होत आहे. एवढेच नव्हे तर ते राहत असलेल्या गल्लीतील पेव्हरब्लॉक चांगले नसल्याचे त्यांनी मान्य केले. सुलाखे यांनी कचराकुंडीमुक्त वॉर्ड असल्याचा दावा केला. त्यानुसार, त्यांच्या वॉर्डात गणेश मंदिराच्या पाठीमागे, नाल्यालगत आणि अन्य दोन ठिकाणी कचरा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर ते म्हणाले की, ही समस्या सोडवण्यासाठी शक्य आहे, त्या सर्व ठिकाणी वाचनालय, ज्येष्ठ नागरिक कट्टा करण्यात येणार आहे. परंतु, शहरातील वाचनालयांची पडीक अवस्था बघता तसे करू नये, असे नागरिकांना वाटते. रेल्वे स्थानकालगत देवीचापाडा येथे हा वॉर्ड असून या ठिकाणीही केडीएमटीची बस येत नाही. गल्लीबोळांचे रस्ते असून तुलनेने ते धड असल्याचा दावा नगरसेवकाने केला. परंतु, ते राहत असलेल्या गल्लीतील पेव्हरब्लॉक निकृष्ट दर्जाचे असून ते अवघ्या काही महिन्यांतच झिजले आहेत. तेथील रस्ता ओबडधोबड झाला आहे. येथे पार्किंगची समस्यादेखील मोठ्या प्रमाणावर आहे. अरुंद रस्ते असून तेथे अस्ताव्यस्त वाहने उभी असतात. बंदिस्त नाल्याचे काम करताना ते रस्त्याच्या उंचीला आणण्याची शक्कल सुलाखेंनी लढवली, परंतु ती सपशेल फेल ठरली. रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाले असून ते येथेही पसरले आहेत. त्यांना बसण्यासाठी एका आरक्षित भूखंडावर जागा करण्याचा प्रस्ताव सुलाखेंनी ठेवला आहे. परंतु, ती जागा केंद्राची असल्याने तो निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचा प्रश्न जटील होत आहे. एकही गार्डन नाही, करमणुकीची जागा नाही. त्यामुळे येथील लहानग्यांना खेळण्यासाठी भागशाळा मैदान येथे १५ मिनिटे चालत जावे लागते. तर, ज्येष्ठांना बाजूच्या वॉर्डातील उद्यानात जावे लागते. १ कोटी २७ लाख निधीच्या प्रस्तावातून यूटीडब्ल्यूटीअंतर्गत गल्ल्या काँक्रीट करण्याचा त्यांचा मानस आहे, परंतु ती फाइलही पास झालेली नाही. त्यांच्याच बाजूच्या वॉर्डात ते काम सुरू झाले आहे, त्यामुळे सुलाखे यांचा पाठपुरावा कमी पडल्याची टीका नागरिक करीत आहेत.
नाला बंदिस्त करायला ५ वर्षे
By admin | Updated: September 7, 2015 03:53 IST