ठाणे - ठाणे ते अलीमघरच्या दिशेने निघालेल्या टिएमटी बसचा पारसिक नगर येथे ब्रेक फेल झाल्याची घटना घडली. परंतु चालकाने दाखविलेल्या प्रंसगावधानामुळे बसमधील सुमारे ४५ प्रवाशांचा जीव वाचला आहे. चालकाने लागलीच गाडी रस्त्याचे काम सुरु असलेल्या ठिकाणी खाली उतरविली. परंतु या गडबडीत काही प्रवाशांनी चालत्या बसमधून उड्या देखील मारल्या. सुदैवाने ते देखील सुखरुप बचावले आहेत.बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास ठाणे स्टेशन ते अलीमघर अशी टिएमटीची बस निघाली. जवळ जवळ अर्धा ते पाऊण तासाच्या अंतराने या बसच्या फेऱ्या असल्याने या बसला नेहमीच कोणत्याही वेळेस गर्दी असते. त्यामुळे दुपारची वेळ असतांना देखील या बसमध्ये सुमारे ४० ते ४५ प्रवासी बसले होते. ही बस पारसिक नगर येथे पोहचली असता. येथील स्थानकावर प्रवाशांना उतरायचे होते. त्यामुळे बसच्या चालक चोरगे याने बसचा ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु ब्रेक काही लागला नाही. त्यामुळे गाडीचे ब्रेक फेल झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यातही प्रवाशांना उतरायचे असल्याने त्यांनी बस थांबविण्याची विनंती देखील केली. परंतु बस काही थांबत नव्हती. त्यामुळे काही प्रवाशांनी बसमधून उड्या मारुन आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे यावेळेस बसचा वेग कमी असल्याने उडी मारलेल्या प्रवाशांचा जीव वाचला. दरम्यान उर्वरित प्रवाशांना वाचविण्यासाठी चालकाने गाडी तत्काळ रस्त्याच्या खाली उतरविली. याठिकाणी रस्त्याचे कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु असल्याने बस रस्त्याच्या खाली उतरताच थांबली आणि सुदैवाने बसमधील सर्वच प्रवाशांचा जीव वाचला.दरम्यान आठ दिवसापूर्वी पूर्णा येथे निघालेल्या बसचा टायर फुटून दोन पादचाऱ्याना मार लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर आठवड्यातच अशा प्रकारे दुसरी घटना घडल्याने टिएमटीच्या जुन्या बस बाबत शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.
बस चालकाच्या प्रसंगवधानामुळे वाचले ४५ प्रवाशांचे प्राण, टिएमटीच्या बसचे झाले ब्रेक फेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 18:16 IST
पारसिक नगर येथे टिएमटीचा ब्रेक फेल झाल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने चालकाने दाखविलेल्या प्रंसगावधनाने बसमधील सुमारे ४५ प्रवाशांचा जीव वाचला आहे.
बस चालकाच्या प्रसंगवधानामुळे वाचले ४५ प्रवाशांचे प्राण, टिएमटीच्या बसचे झाले ब्रेक फेल
ठळक मुद्देआठवड्यातील दुसरी घटनाबसमधील ४५ प्रवाशांचा वाचला जीवकाही प्रवाशांनी बचावासाठी बसमधून मारल्या उड्या