डोंबिवली : प्लास्टिक बंदी असतानाही शहरात सर्रास प्लास्टिक पिशव्या मिळत आहेत. गणेशोत्सव काळात दहा दिवसांत २४ हजार ३०५ किलो निर्माल्य विविध ठिकाणच्या विसर्जनस्थळी संकलित करण्यात आले. त्यात चार हजार ३९५ किलो प्लास्टिक आढळून आले. हे पर्यावरणाला घातक असल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.
शहरात कोपर, गणेशघाट जुनी डोंबिवली, रेतिबंदर, सातपूल जेट्टी, कुंभारखाण पाडा, चोळेगाव तलाव, मिलापनगर तलाव, नेहरूनगर या ठिकाणी आपले स्वयंसेवक काम करीत होते. पर्यावरण दक्षता मंचच्या रूपाली शाईवाले यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध सामाजिक, पर्यावरणीय संस्थांनी एकत्र येत सुमारे १००हून अधिक स्वयंसेवक शहरभर कार्यरत होते. प्लास्टिकचा वाढता वापर तत्काळ थांबविणे गरजेचे असून, महापालिका प्रशासनाने तातडीने हे प्रकार थांबविण्यासाठी जनजागृतीपर व्यापक मोहीम सुरू करणे गरजेचे असल्याचे शाईवाले म्हणाल्या.
------------------