कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागासाठी जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत दाखल झालेल्या बसपैकी ४० मिडी बस लवकरच उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यातील पहिली बस आणि महिलांसाठी मंजूर केलेली ‘तेजस्विनी बस’ दाखल झाली आहे. ‘तेजस्विनी बस’चे शुक्रवारी प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे.जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत केडीएमटी उपक्रमासाठी १८५ बस मंजूर झाल्या आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत ७१ बस आल्या आहेत. नजीकच्या काळात त्यातील ४० मिडी बस दाखल होणार आहेत. अन्य सात मोठ्या बसही येणार असल्याने उपक्रमातील बसचे संचालन आता सुरळीत होण्याची शक्यता आहे. केडीएमटीच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणावर बस दाखल होणार असल्याने त्या ठेवण्यासाठी जागा अपुरी पडणार आहे. त्यामुळे खंबाळपाडा आगारातील कचऱ्याच्या गाड्या तातडीने हटवल्या जाणार आहेत. ४० मिडी बसपैकी एक बस अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर केडीएमटी उपक्रमात दाखल झाली असून तिची आरटीओदरबारी नोंद झाली आहे. उर्वरित बसही लवकरच ताफ्यात येतील, अशी माहिती आगार व्यवस्थापक संदीप भोसले यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)एक कोटी २० लाख मंजूरमहिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारने महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बस योजना सुरू केली आहे. राज्यातील विविध महापालिकांना ठरावीक बस महिला लोकसंख्येच्या प्रमाणात देण्यात येणार आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमासाठी सरकारकडून चार बस मंजूर झाल्या आहेत. त्यासाठी येणारा भांडवली खर्च म्हणून सरकारकडून केडीएमसीला एक कोटी २० लाख मंजूर केले आहेत. या बस खरेदी करण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. परिवहन आणि महासभेच्या मान्यतेने धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती केडीएमटीचे महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी ‘लोकमत’ला दिली.
केडीएमटीकडे लवकरच ४० बस
By admin | Updated: May 5, 2017 05:53 IST