बिर्लागेट : कल्याण तालुका शहरी व ग्रामीण असा विभागला गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास झाला नाही. परंतु, ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुमारे ३६८ कोटी रुपयांचा निधी आणला आहे. त्यामुळे गावातील पथदिवे, पाणी, आरोग्य आदी विषय मार्गी लागतील. महसुली गावांत यापुढे स्मशानभूमींच्या शेड पत्र्यांऐवजी स्लॅबच्या असतील. त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले. कल्याण पंचायत समितीची आमसभा नुकतीच गोवेली येथे झाली. याप्रसंगी ते बोलत होते. तहसीलदार किरण सुरवसे, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर, वन विभागाचे एस.एस. खेडेकर, पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे आदी अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कथोरे म्हणाले की, इतिहासात पहिल्यांदाच गोवेली येथे आमसभा होत आहे. कल्याण जिल्हा झाल्यानंतर गोवेली तालुका करणार आहे. त्यामुळेच येथे ही सभा घेतली आहे. आमसभेची सुरुवात शिक्षण विभागाच्या तक्रारीने झाली. म्हारळमधील डॉ. सोमनाथ पाटील यांनी एबीएल प्रोजेक्ट बंद आहे. त्यामुळे त्याची चौकशी करावी, अशी मागणी केली. मानिवलीचे अॅड. सुनील गायकर यांनी शालेय पोषण आहार योजनेचे बिल बचत गटांना मिळालेले नसल्याने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. मोस गावचे चिंतामण मगर यांनी शिक्षक वेळेवर येत नाहीत. शिक्षण विभागातील सावळा गोंधळ थांबवावा, अशी विनंती केली. (वार्ताहर)समृद्धीला विरोध नकोसरकारच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाला विरोध करू नका. मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, असे या वेळी आमदार किसन कथोरे यांनी आमसभेत सांगितले. पुढे त्यांनी तहसील कार्यालय, पुरवठा विभागातील दलालांना प्रशासनाने आवर घालावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
ग्रामीण भागासाठी ३६८ कोटींचा निधी
By admin | Updated: April 1, 2017 05:24 IST