ठाणे : तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेंतर्गत निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये या वर्षी शहरातील दीड दिवसाच्या १६ हजार ३३ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. तर, महापालिकेच्या गणेशमूर्ती स्वीकार केंद्रांमध्ये प्राप्त झालेल्या एकूण ६२२ गणेशमूर्तींचे महापालिकेने विधिवत विसर्जन केले. गेल्या वर्षीच्या १५८२८ च्या तुलनेत या वर्षी त्यात वाढ झाली असून ही संख्या १६ हजार ३३ पर्यंत पोहोचली आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शहरात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्था केली आहे. याअंतर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन नीळकंठ ग्रीन (टिकुजिनीवाडी) येथे कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. तर, पारसिक रेतीबंदर आणि कोलशेत बंदर येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाटावरही पर्यायी विसर्जन व्यवस्था केली आहे. त्याशिवाय, मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावरही गणेशमूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे.या पर्यायी व्यवस्थेचा लाभ घेऊन शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या दीड दिवसाच्या गणपतीचे वाजतगाजत विधिवत विसर्जन केले. मासुंदा तलावामध्ये या वर्षी २१६०, रायलादेवी येथील दोन कृत्रिम तलावांत गेल्या वर्षीच्या २२४३ गणेशमूर्तींच्या तुलनेत या वर्षी २३२९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. उपवन आणि नीळकंठ ग्रीन येथील दोन कृत्रिम तलावांमध्ये गेल्या वर्षीच्या २६१५ तुलनेत या वर्षी २७५३ श्रींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आंबेघोसाळे येथील कृत्रिम तलावामध्ये या वर्षी ८१५ आणि पारसिक रेतीबंदर येथे बांधण्यात आलेल्या विसर्जन महाघाटावर गेल्या वर्षीच्या ६३९ तुलनेत या वर्षी ६७१ मूर्तींचे विसर्जन झाले. तर, कोलशेत घाटासह इतर सात विसर्जन घाटांवर गेल्या वर्षीच्या ३१३२ तुलनेत या वर्षी ३२४१ गणेशमूर्तींचे विसर्जन केले. तर, कळवा प्रभाग समितींतर्गत विविध विसर्जन घाटांवर एकूण १३५४ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. (प्रतिनिधी)
पालिकेच्या कृत्रिम तलावात १६ हजार ३३ श्रींचे विसर्जन
By admin | Updated: September 20, 2015 00:05 IST