भिवंडी : रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे मानत धामणकरनाका मित्र मंडळाने गणेशोत्सवात भरवलेले रक्तदान शिबिर हेच खऱ्या अर्थाने समाजहिताचे काम आहे, असे उद्गार भाजप आमदार संजय केळकर यांनी बुधवारी शिबिराच्या शुभारंभप्रसंगी काढले. दरम्यान, या शिबिरात १४५ दात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष संतोष एम. शेट्टी व पदाधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवात विविध आरोग्य तपासणी शिबिरे भरवून हा उत्सव आरोग्य उत्सव म्हणून साजरा करून या मंडळाने सर्वांसमोर आदर्श ठेवला असल्याचे केळकर पुढे म्हणाले.
कोरोनामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवू लागल्याने त्याचा ताण आरोग्य व्यवस्थेवर पडला. आजही रक्ताची कमतरता भासत असल्याने शस्त्रक्रियांसह इतर उपचारांसाठी रुग्ण ताटकळत असल्याने हा रक्ताचा तुटवडा भरून निघावा तसेच गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे, यासाठी मंडळाने मागील वर्षी १० दिवस रक्तदान शिबिर घेतले होते. त्यात ५०० रक्त पिशव्यांचे संकलन केल्याची महिती शेट्टी यांनी दिली.
दरम्यान, ठाणे येथील कै. वामनराव ओक रक्तपेढीच्या सहकार्याने यंदा भरवलेल्या या शिबिरात १४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. या सर्व रक्तदात्यांना मंडळातर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
--------------