ठाणे : ठाण्यातील एका व्यावसायिकाच्या गोदामातून सूर्यफुलाच्या तेलाचा साठा परस्पर विकून १२ लाखांची अफरातफर करणाऱ्या कर्मचाऱ्यास श्रीनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली.ठाण्यातील नितीन नाक्याजवळ राहणारे दिनेश शाह यांचा सूर्यफुल तेल आणि मसालेविक्रीचा व्यवसाय आहे. किसननगरातील पॅराडाइस इंडस्ट्रिअल इस्टेट परिसरातील गोदामात त्यांनी मालाचा साठा केला होता. या मालाचा व्यवहार सांभाळण्यासाठी दिघा येथील श्रेणिक ऊर्फ सनी सेठ (जैन) हा त्यांच्याकडे कामावर होता. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत सनी सेठ याने १२ लाख रुपयांचे तेल आणि मसाले कळवा, खारेगाव आणि दिवा परिसरांतील दुकानदारांना विकले. मालाच्या मोबदल्यात मिळालेली संपूर्ण रक्कम त्याने हडपली. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर दिनेश शाह यांनी श्रीनगर पोलिसांकडे सोमवारी तक्रार दिली. न्यायालयाने आरोपीला २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)
१२ लाखांचे तेल परस्पर विकले
By admin | Updated: April 20, 2017 05:10 IST