कल्याण : येथील महात्मा फुले चौक पोलिसांनी गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सापळा लावून अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी आलेल्या विजयकुमार पटेल (२७) याला अटक केली. त्याच्याकडून १४ लाख ८४ हजार १०० रुपयांचा ९८.९४० किलो वजनाच्या गांजासह मोबाइल आणि गुन्ह्यात वापरलेली जीप असा एकूण १८ लाख ३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज रोडवर इंदिरानगर येथील सार्वजनिक स्वच्छतागृहासमोर एक जण अमली पदार्थाचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सरोदे यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा लावून आरोपीला जेरबंद केले.
कल्याणमध्ये १०० किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:38 IST